मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची 'पोलखोल यात्रा' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

"मुख्यमंत्री या महाजनादेश यात्रेदरम्यान जे दावे करत आहेत ते कसे खोटे आहेत हे आम्ही जनतेला दाखवून देणार आहोत," असं पटोले यांनी स्पष्ट केले.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २१ ऑगस्टपासून नंदूरबारमधून महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु करत आहेत. त्याआधीच मुख्यमंत्र्यांच्या या यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेस राज्यभरामध्ये पोलखोल यात्रा काढणार आहे. काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पोलखोल यात्रा 20 ऑगस्टपासून सुरू होईल.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोजरी गावातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाजनादेश यात्रेला सुरुवात केली होती तेथून काँग्रेसही पोलखोल यात्रा सुरु करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. राजीव गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच २० ऑगस्टपासून काँग्रेस महाराष्ट्रामध्ये पोलखोल यात्रेला सुरुवात करणार आहे. 

"मुख्यमंत्री या महाजनादेश यात्रेदरम्यान जे दावे करत आहेत ते कसे खोटे आहेत हे आम्ही जनतेला दाखवून देणार आहोत," असं पटोले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कोल्हापूर आणि सांगलीतील पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा अर्ध्यावर सोडत मुंबई गाठली होती. कोल्हापूर आणि सांगलीतील पुराचं पाणी ओसरलं असून परिस्थिती सर्वसामान्य होत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा निवडणूक प्रचाराकडे वळवला आहे. २१ ऑगस्टपासून नंदूरबारमधून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे अशी माहिती महाजनादेश यात्रेचे नियोजन प्रमुख सुरजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress starts polkhol Yatra in Maharashtra