Vidhan Sabha 2019 : विरोधी पक्षनेतेपदाच्या कारकिर्दीत ‘ते’ कुठे होते?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

विधानसभा 2019

संगमनेर - ‘‘काँग्रेसमधले बडे बडे गेले आहेत. पुढे कसे होणार, याची काळजी करणाऱ्यांना समजेल, आता नवे बडे तयार होत आहेत. जिल्ह्यात १२ विरुद्ध शून्य अशी वल्गना करणाऱ्यांनी शून्य विरुद्ध १२ होताना पाहण्याची तयारी ठेवावी,’’ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना काल दिला. 

विधानसभा 2019

संगमनेर - ‘‘काँग्रेसमधले बडे बडे गेले आहेत. पुढे कसे होणार, याची काळजी करणाऱ्यांना समजेल, आता नवे बडे तयार होत आहेत. जिल्ह्यात १२ विरुद्ध शून्य अशी वल्गना करणाऱ्यांनी शून्य विरुद्ध १२ होताना पाहण्याची तयारी ठेवावी,’’ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना काल दिला. 

काँग्रेस आघाडीच्या संगमनेर, शिर्डी व श्रीरामपूर मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचार प्रारंभ सभेत ते बोलत होते. ‘प्रदेशाध्यक्ष कुठे आहेत,’ या विखे यांच्या प्रश्‍नावर, ‘तुम्ही काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असताना साडेचार वर्षे कुठे होता,’ असा प्रतिप्रश्‍न करून, ‘त्या वेळी जागेवर असते, तर ही वेळच आली नसती,’ असा टोलाही थोरात यांनी लगावला.

थोरात म्हणाले, ‘‘गेले दोन महिने सातत्याने १८ तासांपेक्षा अधिक वेळ काम करीत आहे. आघाडी बनविणे, बैठका, समन्वय करणे, यात २२ दिवस दिल्लीला गेले. काँग्रेसचे सर्व उमेदवार दमदार आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नाही. २४ तारखेला गुलाल आघाडीचाच राहील.’’ 

काँग्रेस अडचणीत असताना प्रदेशाध्यक्षपद घ्यायची गरज काय होती, यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. याबाबत थोरात म्हणाले, ‘‘शिवाजी महाराज अडचणीत असताना बाजीप्रभू देशपांडे यांनी खिंड लढवून इतिहास घडवला. ती भूमिका आपली आहे. लढवय्यांचा इतिहास होतो. काँग्रेस अनेक वेळा अडचणीत आली, तरी आम्ही डगमगलो नाही. याही वेळी आम्ही जोरदार ताकदीनिशी उभे राहणार आहोत.’’

मोदी व फडणवीस सरकारच्या खोटारडेपणामुळे बाजारपेठ, व्यापारी, कारखानदारी देशोधडीला लागली असून, देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. बेरोजगार गावाकडे परतू लागले आहेत. शेतीमालाचा भाव, युवकांना रोजगार, कर्जमाफी, या मूलभूत प्रश्नांवर ते बोलत नाहीत. त्याबद्दल त्यांच्या उमेदवारांना थेट प्रश्न विचारण्याचे आणि काँग्रेस- ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

ससाणे यांची कांबळेंवर टीका
काँग्रेसमध्ये पुनरागमन झालेले करण ससाणे यांनी भाऊसाहेब कांबळे यांच्यावर टीका केली. ‘‘श्रीरामपूरचा उमेदवार गद्दार असल्याचे मी सांगत होतो, त्या वेळी माझे ऐकले नाही. त्यांनी फसवणुकीची हॅटट्रिक केली; मात्र मतदारसंघात त्यांची विजयाची हॅटट्रिक होऊ देणार नाही.’’ आमदार डॉ. सुधीर तांबे, दत्ता डांगे, प्रकाश देठे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, उमेदवार लहू कानडे, सुरेश थोरात, दादासाहेब मुंडे, नाना भालेराव, प्रफुल्ल कदम (सोलापूर), काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे आदींची भाषणे झाली.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, कांचन थोरात, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, शरयू थोरात, डॉ. जयश्री थोरात, उत्कर्षा रूपवते, ‘राष्ट्रवादी’चे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अरुण कडू, बाजीराव खेमनर, रणजित देशमुख आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress state president Balasaheb Thorat warned minister Radhakrishna Vikhe Patil