'राष्ट्रवादी'च्या मदतीची कॉंग्रेसला प्रतीक्षा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 जानेवारी 2017

नाशिक, औरंगाबादमध्ये अविश्‍वासाचे वातावरण

नाशिक, औरंगाबादमध्ये अविश्‍वासाचे वातावरण
मुंबई - नाशिक पदवीधर आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघांत परस्परांना साथ दिल्यास धर्मनिरपेक्ष शक्तींच्या एकीचे वातावरण निर्माण होऊ शकेल. मात्र, त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मदत करण्याची गरज आहे, असे कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसचे सुधीर तांबे पुन्हा निवडणूक लढवत आहेत; तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विक्रम काळे रिंगणात उतरले आहेत.

या परिसरात दोन्ही पक्ष एकत्र आले तर भाजप-शिवसेनेला रोखता येईल, असे कॉंग्रेसचे मत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस यासंदर्भात कोणतीही मदत करत नसल्याची खंत कॉंग्रेसने व्यक्त केली आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांनी कॉंग्रेसला मदतीसाठी साद घातली होती. "राष्ट्रवादी'चे नेते या संदर्भात कोणतीही मदत करत नसल्याने कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच तांबे यांचा पराभव होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्याच कुटुंबातील काही जणांना फूस लावली असल्याने दोन पक्षांत अविश्‍वासाचे वातावरण अधिकच वाढले आहे, असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची मदत हवी आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीशी संपर्क साधून आम्हाला पक्ष संपवायचा आहे काय, अशी विचारणा केल्याने "राष्ट्रवादी'शी युती करण्यास अडचणी येत आहेत. तरीही नाशिक, औरंगाबाद येथून एकजुटीचा संदेश जावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष स्तरावर चर्चा व्हावी, असेही प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: congress wait for ncp help