सोलापुरातील काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल हे आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षात जाणार आहेत. आज (सोमवारी) दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन श्री. सादुल त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kcr
सोलापुरात काँग्रेसला खिंडार? माजी खासदार सादुल जाणार तेलंगणाचे मुख्यमंत्री ‘केसीआर’ यांच्यासोबत

ब्रेकिंग! सोलापुरातील काँग्रेसचे माजी खासदार ‘केसीआर’ यांच्या बीआरएसमध्ये; काँग्रेसला मोठा धक्का

सोलापूर : सोलापुरातील काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल हे आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षात जाणार आहेत. आज (सोमवारी) दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन श्री. सादुल त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. सध्या गणेश पेंदगोंडा, श्री. कंदिकटला, सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष देखील माझ्यासोबत असतील, अशी माहिती श्री. सादुल यांनी सकाळशी बोलताना दिली. श्री. सादुल यांनामानणारा सोलापुरात मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसला सोलापुरात विशेषत: पूर्व भागात फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.

श्री. सादुल म्हणाले, खंबीर नेतृत्व व सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रवेश

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे शेतकरी, दलित, कामगार, बेरोजगार अशा विविध घटकांसाठी खूप मोठे काम आहे. खंबीर नेतृत्व असलेल्या केसीआर यांनी आता महाराष्ट्रातील निवडणुका लढण्याचे ठरवले आहे. त्यांचे नेतृत्व खंबीर असून सर्वसामान्यांचा विकास हाच त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे मी त्यांची ‘बीआरएस’ पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी खासदार धर्मण्णा सादुल यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

पक्षाची बांधणी झाल्यानंतर त्यांची सोलापुरात मोठी सभा होईल. त्यावेळी अनेकजण त्यांच्या पक्षात प्रवेश करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. १९८९ ते १९९६ या काळात श्री. सादुल हे काँग्रेसचे खासदार राहिले आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. पक्षाबद्दल काहीच तक्रार नाही, पण केंद्र सरकारच्या विरोधात विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनमानी कारभाराविरूद्ध आवाज उठविणारे खंबीर नेतृत्व केसीआर असल्याने आपण त्यांच्यासोबत जात असल्याचेही श्री. सादुल यावेळी म्हणाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल यांना फोन करून ऑफर दिली होती. तसेच तेलगंणाचे मंत्री आणि सादुल यांचे मित्र चंद्रकांत रेड्डी यांनीही त्यांना फोन केला होता. ‘माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही माझ्याबरोबर या. आपण मिळून एकत्र काम करू. मी राष्ट्रीय पातळीवर माझा पक्ष वाढवतोय, त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर यावे’, अशी इच्छा त्यांनी श्री. सादुल यांच्याकडे व्यक्त केली होती. के. चंद्रशेखर राव यांनी आता राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समितीऐवजी भारत राष्ट्र समिती असे केले आहे. आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी शेजारच्या महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी त्यांनी नांदेडमध्ये मेळावे, सभाही घेतल्या आहेत. त्यांनी ‘अगली बार-शेतकरी सरकार’ अशी घोषणा केली. त्यांची क्रेझ आता महाराष्ट्रात वाढू लागली आहे.

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका ‘बीआरएस’ लढणार

के. चंद्रशेखर यांनी त्यांच्या पक्षाची नोंदणी महाराष्ट्रात केली आहे. त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांमध्ये भारत राष्ट्र समिती हा पक्ष दिसणार आहे. तत्पूर्वी, त्यांनी आपल्या ओळखींच्या पक्षात येण्याचे आव्हान केले आहे.