"वाघा'च्या मदतीने कॉंग्रेस करणार भाजपची शिकार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

"राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात,' असे संकेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज दिले. 

संगमनेर :  "राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात,' असे संकेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज दिले. 

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना थोरात बोलत होते. महायुतीमध्ये दिलेला शब्द भाजपने न पाळल्याने शिवसेनेने मराठी बाणा दाखवून त्यांच्यापासून अलग होण्याचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे सांगून थोरात म्हणाले, ""तिघांनी एकत्र येऊन सरकार करायचे असल्याने आणि पाच वर्षे सरकार चालवण्यासाठी त्यातील बारकावे स्पष्ट करणे गरजेचे आहे.

किमान समान कार्यक्रम व्यवस्थित करून काही शंका न ठेवता पुढे जाण्याच्या अनुषंगाने काम सुरू आहे. याबाबत दिल्लीतही दोन-तीन बैठका होतील, अशी अपेक्षा आहे. यात कदाचित चार दिवस जास्त जातील; पण जो निर्णय होईल तो व्यवस्थित होईल.''   

शिवसेनेने थेट कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केल्याने, हायकमांड नाराज झाल्याच्या बातम्या पत्रकारांना कुठून समजतात माहीत नाही; मात्र त्या सर्व सदिच्छा भेटी होत्या. सरकार एकत्रित करायचे असल्याने काही गोष्टी, मने जुळणे आवश्‍यक असल्याने या भेटी घेतल्या, असे थोरात यांनी स्पष्ट केले. किमान समान कार्यक्रमात निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक मुद्दे समान आहेत. कॉंग्रेसचा विचार आणि शिवसेनेचे कट्टर हिंदुत्व जुळवून घेण्यासाठी काळाच्या ओघात काही बदल करणे अपरिहार्य असते, असे सांगत थोरात म्हणाले, ""आपण राज्यघटना मानतो. त्यातील मूलभूत तत्त्वांप्रमाणे निर्णय होतील. घाईगर्दीने निर्णय न घेता, शांततेने व व्यवस्थित निर्णय घेऊन मगच पुढे जावे असा आमचा विचार आहे.'' 

विधानसभा निवडणुकांचे हिशेब सादर करण्याची मुदत संपत आल्याने बहुतांश आमदार मतदारसंघात असल्याने, आज होणारी राज्यपालांची भेट रद्द करण्यात आल्याची माहिती थोरात यांनी दिली. 
 
""मी पुन्हा येईन'मुळे रंगत आली...' 

"""मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' या देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्‍याने राजकारणात रंगत आली. राजकारणात सर्व काही गांभीर्याने घेतले पाहिजे असे नाही. या वाक्‍याचा चांगला उपयोग राजकारण्यांपेक्षा सोशल मीडिया आणि पत्रकारांना झाला. भाजप सरकार पुन्हा येणार असल्याचा फडणवीस यांचा दावा म्हणजे "220 जागा येणार,' असे म्हणण्यासारखा आहे,'' अशी कोपरखळीही थोरात यांनी मारली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress will hunt down BJP