भाजपच्या किल्ल्याला पवारांचा वेढा

logo.jpg
logo.jpg

जामखेड (जि. नगर) : राज्यातील इतर मतदार संघात भाजपने पवारांना चिंतेत टाकले असले तरी नगरमधील जामखेड-कर्जत मतदार संघात पवारांनी भाजपला घेरल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, या मतदारसंघातील एकासाठी मोठ्या साहेबांनी मतदारांचा आशीर्वाद मागितला तर दुसऱ्यासाठी थेट मुख्यमंत्री साहेब जनादेश मागत आहेत. एका बाजूला आमदार निधी, स्थानिक विकास निधीतून रस्त्याच्या बांधकामांचा आणि उद्घाटनांचा धडाका सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकार काही करत नाही म्हणून खासगी उद्योग समूहाच्या माध्यमातून मोफत पाणी वाटपाचे टँकर्स. हे चित्र आहे, राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे विरुद्ध पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे रोहित पवार यांच्यातील लढतीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे.

दरम्यान, दुष्काळ, कोरडवाहू शेती, ऊसतोडीसाठी २५% स्थलांतर, भटक्या जमातींचे सर्वाधिक वास्तव्य व ओबीसी विरुद्ध मराठा या जातीय समीकरणावर खेळली जाणारी लढाई हे येथील प्रत्येक निवडणुकीचे वैशिष्ट्य यावेळीही कायम आहे. भर पावसाळ्यात टँकरच्या प्रतीक्षेत रस्त्यांच्या कडेला असलेले निळे ड्रम येथील टंचाईची विदारकता सांगतात. कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा कर्जत-जामखेड मतदारसंघातील गावांत सध्या १२९ सरकारी टँकर सुरू आहेत. इथले आमदार कॅबिनेट मंत्री राम शिंदे रात्री उशिरापर्यंत कुकडी धरणाच्या चाऱ्या, अमृतलिंग पाणीपुरवठा योजना, बुछवडा जोड तलाव या पाणीपुरवठा योजनांची भूमिपूजने व उद्घाटने करत आहेत.

दरम्यान, प्रत्येक गल्लीत बारामती अॅग्रोच्या फलकावर पाणी पुरवठा करणाऱ्या रोहित पवारांच्या फोटोंचे टँकर फिरत आहेत. दीड-दोन वर्षांपासून रोहित पवारांची मोर्चेबांधणी सुरू आहे. महिलांसाठी पैठणी स्पर्धा, तरुणांसाठी कुस्ती स्पर्धा व शहरात मोफत पाणी वाटप सुरू आहे. शरद पवारांनी आतापर्यंत दोन वेळा येथे हजेरी लावून रोहित यांच्या प्रचाराचा अप्रत्यक्ष नारळ फोडला आहे. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीसांनी राम शिंदेंसाठी प्रचाराचा प्रारंभही केला आहे.

माधव’च भाजपचे बलस्थान -
गेल्या दोन निवडणुकांत माधव (माळी-धनगर-वंजारी) समीकरणावर शिंदेंनी मुसंडी मारली होती. गेल्या २५ वर्षांपासून येथून भाजपचाच आमदार आहे. ‘टीम फडणवीस’चा घटक असल्याने मतदारसंघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिल्हा बँका, कर्जत आणि जामखेड नगरपालिका भाजपच्या ताब्यात घेण्यात शिंदेंना यश आले आहे.

महाऱाष्टा्चे लक्ष असणारा मतदार संघ - 
दोन्ही वेळी ओबीसी, दलित, मुस्लिम व भटक्यांनी आपली मते राम शिंदेंच्या पारड्यात घातली होती. मात्र, यावेळी पवार आडनाव, मराठा समाज व बारामती अॅग्रो कंपनीची यंत्रणा आदी फौजफाट्यासह रोहित पवारांचे त्यांच्यासमोर तगडे आव्हान आहे. अन्य सर्व समाजांत व सामाजिक चळवळींमध्ये अग्रणी जामखेडचे माजी सरपंच अॅड. अरुण जाधव हे वंचित आघाडीतर्फे प्रचार करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com