लढा काेराेनाशी : सामाजिक दायित्व म्हणून कारखान्यांनी पुढाकार घ्यावा : शरद पवार

बाळकृष्ण मधाळे
Sunday, 9 August 2020

कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली तर खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (रविवार) बैठक झाली.

सातारा  : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर आले आहे. आपल्या देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी पुढाकार घेऊन एक छोटेसे अद्यावत रुग्णालयाची  निर्मिती करुन ते जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. नागरिकांनीही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आपला देश राज्य नक्की कोरोना मुक्त होईल, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली तर खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (रविवार) बैठक झाली. यावेळी पवार बोलत होते. या बैठकीस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार मंत्री,  सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार मकरंद पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, हातकणंगलेचे आमदार राजू आवळे, कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव, कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके , सातारा जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते.

तिचे रक्षाबंधन ठरले शेवटचे, नवऱ्यासह सासरचे गेले बाराच्या भावात 

प्रारंभी आराेग्य मंत्री राजेश टाेपे म्हणाले, कोरोना टेस्टींगचा अहवालाला 2 ते 3 दिवस लागत आहेत, त्यामुळे बाधितावर उपचार करण्यास उशीर होत आहे. संबंधिताचा नमुना घेतल्यानंतर त्याचा अहवाल हा 24 तासात प्राप्त झाला पाहिजे म्हणजे संबंधितावर वेळेत उपचार करता येतील. राज्य शासन येत्या काही दिवसात 500 रुग्णवाहिका खरेदी करणार असून त्यांचे वाटप राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांना करण्यात येणार आहे. बऱ्याच रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळत नाहीत म्हणून उपचार करण्यास उशिर होत आहे तरी सातारा व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णवाहिका अधिगृहित कराव्यात.

कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविताना राष्ट्रवादीच्या नेत्यास कोरोनाची बाधा 

सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील एकही कोरोना बाधित हा रुग्णालयातील बेडपासून वंचित राहू नये यासाठी सातारा व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने डॅशबोर्ड तयार करावा. या डॅशबोर्डमुळे कुठल्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे याची माहिती सहज उपलब्ध होते त्यामुळे बाधिताला वेळेत उपचार करता येतील. जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईन नंबरची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचवा, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

कोविडवरील अभ्यासकांचे विशेष पथक कोल्हापूरला पाठविणार : राजेश टोपे 

सातारा कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. कामगाराचा कारखान्यांमार्फत विमा काढला जातो त्या विम्यामध्ये कोरोनाचाही समावेश करावा, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नमूद केले. सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे तरी कुणीही घाबरुन न जाता या संसर्गाला समोर जावूया तसेच राज्य शासन सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम करीत असल्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यावेळी सांगितले. काही कोरोना रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत तरी प्रत्येक कोविड रुग्णालयात शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी व या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखील संबंधिताला बेड उपलब्ध करुन द्यावा, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत केली. 

आरोग्य विभागाच्या रिक्त जागांचा 'हा' महत्वपूर्ण निर्णय

बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले नागरिक आपली माहिती प्रशासनापासून लपवत आहेत. शेवटच्या क्षणी ते आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधतात यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे, परंतु आता प्रत्येक घरात जावून सर्व्हेक्षण करण्याचे काम सुरु असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या बैठकीत सांगितले. कोरोना संदर्भात उपाययोजना राबविण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने येत्या एक-दोन दिवसात मुंबई बैठक घेऊन निधी उपलब्ध करुन द्यावा, असे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी या बैठकीत सांगितले.  कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा वाढवाव्यात, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी बैठकीत सांगितले.

वाळूचे लिलाव नसताना बांधकामे तेजीत कशी? तलाठ्यांचे हात ओले होत असल्याची चर्चा 

कोल्हापूरचे जिल्हा प्रशासन कोरोना संदर्भात चांगले काम करीत असून त्यांना राज्य शासनाने आणखीन सुविधा उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी केल्या. आरोग्य विभागाच्या मागणीनुसार निधी तसेच टेस्टींगचे रिपोर्ट लवकर कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावे, असे आमदार मकरंद पाटील यांनी या बैठकीत सांगितले. फलटण कोविड रुग्णालयात व्हेंटीलेटरची संख्या वाढवावी, असे आमदार दिपक चव्हाण यांनी या बैठकीत सांगितले.
सातारा-जावलीच्या डोंगराळ भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी रुग्णवाहिकांची गरज असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या बैठकीत सांगितले. एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये कोविड सेंटर उभे करावे, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी या वेळी सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरी करणाद्वारे दिली.या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cooperative Factories Should Set Up Hospitals Suggests NCP Leader Sharad Pawar