पुणे महसूल विभागातील 57 पैकी 56 तालुक्‍यात कोरोनाबाधित 

प्रमोद बोडके
Sunday, 5 July 2020

विनाकारण शहराकडे प्रवास करणाऱ्या लोकांवर निर्बंध

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची नोंद करून त्यांची नियमित तपासणी करावी. तापमान मोजणे, पल्स रेट, ऑक्‍सिजन लेवलची तपासणी केली जाणार आहे. ताप सदृश लक्षणे आढळल्यास डॉक्‍टरांच्या मदतीने त्वरित उपचार केले जाणार आहेत. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील इतर आजार असणाऱ्या (खोकला, रक्तदाब, मधुमेह, दमा) व्यक्तींची नियमित तपासणी केली जाणार आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अनेक लोक शहराकडे ये-जा करतात. अशा व्यक्तींच्या नोंदी ठेवण्याची सूचनाही विभागीय आयुक्तांनी केली आहे. दूध पुरवठा करणारे, भाजी विक्रेते यांच्या नियमित नोंदी आता होणार आहेत. प्रवासाचे साधन काय? आवश्‍यक कारण असल्यासच प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार आहे. विनाकारण शहराकडे प्रवास करणाऱ्या लोकांवर निर्बंध आणले जाणार आहेत. 

सोलापूर : पुणे महसूल विभागात असलेल्या एकूण 57 तालुक्‍यांपैकी 56 तालुक्‍यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या विभागातील पाच हजार 652 ग्रामपंचायतींपैकी 1 हजार 71 ग्रामपंचायतीमध्ये 3 हजार 454 इतके रुग्ण आढळून आले आहेत. 136 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्याचे महसूल विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज ग्रामीण भागातील यंत्रणा अधिक सज्ज केली आहे.

पुणे विभागातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये काय कार्यवाही करावी? याबाबतच्या स्पष्ट सूचना त्यांनी आज दिल्या आहेत. शहरातून आणि गावातून प्रवास करून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व व्यक्तींची आरोग्य तपासणी करून ते शहरातून आले असतील तर होम क्वारंटाईन किंवा इंन्स्टट्युन्शल क्वारंटाईनची व्यवस्था करावी लागणार आहे.

नोकरीनिमित्त दैनंदिन शहराकडे जाणारा कर्मचाऱ्यांचीही स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे. शहरी भागांमध्ये उद्योग-व्यवसाय सुरू झाल्याने ग्रामीण भागातील अनेक नागरिक शहरांमध्ये नोकरीनिमित्त दररोज ये-जा करतात. अशा कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नोंदवही ग्रामपंचायतीमध्ये ठेवून या नोंदवहीमध्ये कर्मचाऱ्याचे नाव, प्रवासाचे कारण, नोकरीचे ठिकाण, प्रवासाचे साधन, तापमानाची नोंद इत्यादी तपशील नमूद केला जाणार आहे. 
 
पुणे विभागातील कोरोनाची स्थिती 
पुणे : 242 ग्रामपंचायती बाधित, 1027 रुग्ण, 
सातारा : 326 ग्रामपंचायतीबाधित, 1009 रुग्ण, 46 मृत्यू 
सांगली : 114 ग्रामपंचायतीबाधित, 340 रुग्ण, मणदूरमध्ये (ता. शिराळा) आढळले 60 रुग्ण 
सोलापूर : 61 ग्रामपंचायतीबाधित, 315 रुग्ण, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कुंभारीत 82 तर मुळेगावात 39 रुग्ण 
कोल्हापूर : 328 ग्रामपंचायतीबाधित 763 रुग्ण 
(बाधित रुग्ण व ग्रामपंचायतीच्या आकडेवारीत बदल होऊ शकतो)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona affected in 56 out of 57 talukas of Pune revenue division