राज्यात कठोर निर्बंधाची तयारी; जनतेनं मानसिकता ठेवावी - राजेश टोपे

rajesh tope
rajesh tope

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि लॉकडाऊनची सुरु असलेली चर्चा या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं बेडचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र सगळीकडेच अशी परिस्थिती नाही असंही राजेश टोपेंनी स्पष्ट केलं. काही ठराविक भागांमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे. असा ठिकाणिी बेड मिळण्यासाठी अडचणी येत आहेत असं सांगताना त्यांनी मुंबईचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, मुंबईत आयसीयुचे बेड ४०० , ऑक्सिजन बेड २०००, व्हेंटिलेटर बेड २१३ आहेत, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचंही टोपेंनी सांगितले. 

बेड्स अपुरे पडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आल्याचंही राजेश टोपेंनी सांगितले. ते म्हणाले की, बेड्स वाढवण्याच्या सूचना सर्व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय इतर गरजेचं साहित्य उपलब्ध करून दिली जाईल. तसंच ज्या अडचणी आल्या होत्या त्या दूर करण्यात आल्या आहेत. लसीकरणाचा वेग पाहता लवकरच हर्ड इम्युनिटी तयार होईल आणि कोरोनाचं प्रमाण कमी होईल अशी आशाही राजेश टोपेंनी व्यक्त केली. सोशल डिस्टन्सिंगसाठी नियोजन केलंच जातं. लोक असेच वागणार असतील तर निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असं सांगण्यात आलं आहे. नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा असंही आवाहन टोपेंनी केलं. 

राज्यात लॉकडाऊन होणार का? असे विचारले असता अद्याप लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असं राजेश टोपेंनी सांगितलं. लॉकडाऊबाबत चर्चा सुरु असते पण सध्या आहेत ते निर्बंध कठोर करण्याचं नियोजन केलं जात आहे. गरज पडल्यास कठोर पावले उचलली जातील, लोकांना त्यादृष्टीने मानसिकता ठेवावी. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लागू करण्यासाठी नियोजन सुरु आहे. त्याबद्दल अंतिम निर्णय झाला की सांगण्यात येईल असंही टोपे म्हणाले. 

जल्लोष परवडणारा नाही
औरंगाबादमध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन मागे घेण्यात आला. त्यानंतर औंरगाबादमध्ये इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. हे योग्य नाही आणि सध्याच्या परिस्थितीत परवडणारं नसल्याचं राजेश टोपे म्हणाले. गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं गरजेचं आहे. इम्तियाज जलील माझे मित्र आहेत ते नक्कीच या गोष्टीचं भान ठेवतील असं टोपेंनी सांगितलं. 

शरद पवार यांची प्रकृती स्थिर
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. दुर्बिणीद्वारे त्यांची शस्त्रक्रिया झाली असून प्रकृती स्थिर आहे. त्यांना चार ते पाच दिवसात डिस्चार्ज मिळेल. मात्र आणखी एक शस्त्रक्रिया करायची असल्यानं त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. पुढची शस्त्रक्रिया आठ ते दहा दिवसात करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचंही राजेश टोपे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com