खर्चही वसूल झाला नाही 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

मुंबई - साहित्य संमेलन म्हटलं की कोट्यवधींची पुस्तकविक्री, असं काहीसं समीकरणच गेल्या काही वर्षात जुळून आलं होतं; मात्र यंदाच्या डोंबिवली येथे झालेल्या 90 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये प्रकाशकांच्या स्टॉलचे साधे भाडे किंवा वाहतुकीचा खर्चही वसूल न झाल्याने प्रकाशकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मुंबई - साहित्य संमेलन म्हटलं की कोट्यवधींची पुस्तकविक्री, असं काहीसं समीकरणच गेल्या काही वर्षात जुळून आलं होतं; मात्र यंदाच्या डोंबिवली येथे झालेल्या 90 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये प्रकाशकांच्या स्टॉलचे साधे भाडे किंवा वाहतुकीचा खर्चही वसूल न झाल्याने प्रकाशकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

डोंबिवली येथे झालेल्या संमेलनाची व्हायला हवी होती, तशी पूर्वप्रसिद्धी झाली नाही. एवढंच काय, तर डोंबिवली स्टेशनवर उतरल्यानंतरही इथे अखिल भारतीय साहित्य संमेलन होते आहे, अशी साधी वातावरणनिर्मिती नव्हती; तर शहरांमध्ये पुस्तकखरेदीचे अनेक पर्याय वाचकांकडे उपलब्ध असतात. त्यामानाने गावाकडे वाचकांना तो पर्याय नसतो. त्यामुळे दूरदूरच्या गावचे लोकही या संमेलनांना हजेरी लावून ग्रंथखरेदी करतात. त्याचप्रमाणे यंदाच्या संमेलनात थोडेथोडके नव्हे, तर साधारण साडेतीनशेहून अधिक पुस्तकांचे स्टॉल होते. त्यामुळे एवढे सगळे फिरण्यासाठी तेवढा वेळ लोकांकडे नसल्यामुळे काही स्टॉलकडेच गर्दी झाली, काही प्रमाणात विक्रीही झाली. मात्र, मोठ्या ग्रंथप्रदर्शनामुळे गावागावांतून आलेले छोटे प्रकाशक मागे पडल्याचे चित्र दिसून आले; तर काही वेळा स्टॉलवर जत्रेसारखी गर्दी झाली; मात्र त्याचे रूपांतर खरेदीत होऊ शकले नाही. त्यामुळे डोंबिवलीचे संमेलन एकंदरीत प्रकाशकांना मात्र महागात पडल्याचे दिसले. 

दर वर्षी संमेलनाला येणारा दर्दी रसिक पुस्तकांचीही तितकीच चांगली खरेदी करतो. त्यामुळे दर्दी रसिकाच्या हाती आपले पुस्तक गेल्याच्या आनंदाबरोबरच विक्रीचाही आनंद असतो. मात्र यंदाच्या संमेलनाची कमी झालेली प्रसिद्धी आणि रसिकांचा अनुत्साह यामुळे पुण्यावरून मुंबईमध्ये पुस्तकं आणण्याचा साधा वाहतूक खर्चही वसूल झाला नाही. गेल्या काही संमेलनात हे पहिल्यांदा घडलं. छोट्या प्रकाशकांना याचा मोठा फटका बसला. 
- घनश्‍याम पाटील, चपराक प्रकाशन 

आज शहरी वाचकांपेक्षा ग्रामीण भागांत वाचक वाढतो आहे. डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे. तिथे नियमित साहित्यविषयक कार्यक्रम, पुस्तकविक्रीची प्रदर्शने भरवली जातात. त्यामुळे विक्री झाली नसेल. स्टॉलचे घेतलेले साधे 6 हजारांचे भाडेही या तीन दिवसांत वसूल झाले नाही. त्याचप्रमाणे छोट्या आणि मोठ्या प्रकाशकांचे स्टॉल नियोजनपूर्वक लावणे अपेक्षित होते; मात्र अनेक छोट्या प्रकाशकांना कोपऱ्यात जागा मिळाल्याने रसिक वाचक तिथपर्यंत पोहोचलेच नाहीत. 
- नीलिमा कुलकर्णी, राजेंद्र प्रकाशन 

Web Title: Costs not recovered