निर्यातीसाठी विश्वासार्हता हवी - पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुणे/औंध - द्राक्ष निर्यातीमध्ये भारताचा वाटा केवळ सहा ते सात टक्के आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना निर्यातीच्या क्षेत्रात खूप संधी असून, त्यासाठी चांगल्या वाणाचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. हरितक्रांतीनंतर भारताची निर्यातदार देश म्हणून ओळख निर्माण झाली. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतमालाच्या निर्यातीसाठी आपण दर्जेदार उत्पादने आणि गुणवत्ता यांच्या जोरावर विश्वासार्हता दृढ करून देशाचा नावलौकीक वाढवावा, असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात गुरुवारी आयोजित महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ५८ व्या वार्षिक मेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सोपान कांचन आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ठरावीक जिल्ह्यात होणारे द्राक्ष उत्पादन विदर्भ, मराठवाड्यासारख्या भागातही होत आहे. त्यात जाणकार शेतकरी व शास्त्रज्ञांचा महत्त्वाचा वाटा आहे. केवळ द्राक्षच नाहीतर फळबागाच्या उत्पादनात आणि निर्यातीतही आपण आघाडीवर आहोत. परंतु, विश्वासार्हता महत्त्वाची असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तांदूळ, गहू, फळे व कापसाच्या निर्यातीत आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. शीर्षस्थानी येण्यासाठी शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे.

द्राक्ष शेती व निर्यातीसंदर्भात अनेक आव्हाने आहेत. त्यावर मात करून पुढे जाण्यासाठी विशेष प्रयत्न करणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कडक कायदे करणे गरजेचे आहे. या वेळी विविध जिल्ह्यांतील द्राक्ष उत्पादक उपस्थित होते.

उसाला पर्याय शोधण्याचा प्रयत्न
इजिप्तसह काही देशांमध्ये बीटपासून साखरेचे उत्पादन घेतले जाते. ऊस आणि बीटचा वापर करून साखर कारखाने १० ते ११ महिने सुरू ठेवणे शक्‍य आहे. त्यामुळे कारखान्यांचा बराचसा प्रशासकीय खर्च निघण्यास मदत होईल. परदेशातील संशोधनाचा अभ्यास करण्यासाठी ऑक्‍टोबर महिन्यात शिष्टमंडळ जाणार असून, तेथील तंत्रज्ञान देशात कसे आणता येईल, याचा प्रयत्न सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन  
या दोनदिवसीय अधिवेशनात शेतकऱ्यांना शास्त्रज्ञ, कृषी, पणन विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नवीन तंत्रज्ञान, बियाणे, पाणी बचत आणि निर्यातीसंदर्भात माहिती मिळावी, यासाठी प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. 

Web Title: Credibility for Export Sharad Pawar