राज्यातील पतसंस्थांचे 1 डिसेंबरला कामबंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पतसंस्था या सर्वसामान्य आणि कष्टकऱ्यांना सेवा देणाऱ्या आहेत. बहुतांश पतसंस्थांची खाती जिल्हा बॅंकांमध्ये असून त्यांच्यावर घातलेल्या निर्बंधांनी पतसंस्थांचे व्यवहार ठप्प झाले आहे. रिझर्व्ह बॅंकेने याचा गांभीर्याने विचार करून जिल्हा बॅंकांवरील नियम शिथिल करावेत.
- अविनाश भोसले,
अध्यक्ष, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड

मुंबई: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना जुन्या नोटा स्वाकारण्यास आणि बदल्यास रिझर्व्ह बॅंकेने बंदी घातली आहे. यामुळे जिल्हा बॅंकांवर अवलंबून असलेल्या पतसंस्थांचीदेखील कोंडी झाली आहे. नोटाबंदीसंदर्भातील निर्बंध मागे घेण्यासाठी येत्या एक डिसेंबरला राज्यभरातील पतसंस्था कामबंद आंदोलन करून रिझर्व्ह बॅंकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

राज्यभरात 15 हजार 670 सहकारी पतसंस्था आहेत. मात्र नोटाबंदीनंतर सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना नोटा बदलणे आणि स्वीकारण्यास मज्जाव केला आहे. या बॅंकांवर अवंलबून असलेल्या पतसंस्थांना या बंदीची झळ बसली आहे. जवळपास सर्वच पतसंस्थांची खाती जिल्हा बॅंकांमध्ये आहेत. जिल्हा बॅंकांवरील बंदीने पतसंस्थांचे व्यवहार रखडले असून यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. पतसंस्थांना दैनंदीन व्यवहार सुरळीत होण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार पैसे काढता यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोकाटे यांनी केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधांविरोधात एक डिसेंबरला फेडरेशनने बंदची हाक दिली असून या दिवशी आझाद मैदानातून रिझर्व्ह बॅंकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती कोयटे यांनी दिली. सरकारी आणि खासगी बॅंकांशी पतसंस्थांशी तुलना करणे अयोग्य असल्याचे मत शिवकृपा सहकारी पतपेढीचे अध्यक्ष अविनाश भोसले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, पतसंस्थांना जिल्हा बॅंकांकडून पैसे पुरेशा प्रमाणात मिळाल्यास त्यांच्या ग्राहकांना किमान सेवा देणे शक्‍य होईल. जिल्हा बॅंकांवरील बंदीने पतसंस्थांचेही चार कोटी ग्राहक वेठीस धरल्याची भावना भोसले यांनी व्यक्त केली.

 

Web Title: credit societies to go on strike