राज्यातील बेकायदा स्कूल व्हॅनवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

न्यायालयाच्या निर्णयानुसार अनधिकृत स्कूल बस व व्हॅनवर कारवाई केली जात आहे. अवैधरीत्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. 
- शेखर चन्ने, राज्य परिवहन आयुक्त

मुंबई - बेकायदा आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. परवानाधारकांकडूनही स्कूल बसच्या सुरक्षा नियमांचा भंग केला जात असल्याच्या तक्रारी पालकांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे केल्या आहेत. त्यानुसार १० डिसेंबरपर्यंत स्कूल बसची विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) स्कूल बसना परवानगी दिली असून, सुरक्षेच्या दृष्टीने काही नियम आखून दिले आहेत; परंतु परवानाधारकांकडूनच या नियमांची पायमल्ली होत आहे. परवानगी नसतानाही अन्य वाहनांमधून विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक केली जात आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा : काँग्रेसच्या सभेत कार्यकर्ता म्हणाला, प्रियंका चोप्रा जिंदाबाद

राज्यातील प्रत्येक आरटीओ विभागात विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. वाहनचालकाचा परवाना, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली जाईल. त्याचप्रमाणे आरटीओ अधिकाऱ्यांनी आखून दिलेल्या नियमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे.

आणखी वाचा : बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे!

आवश्‍यक यंत्रणा
स्कूल बसमध्ये धोक्‍याचा इशारा देण्यासाठी पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजा, शालेय प्रयोजनासाठीच वाहन वापरण्यात येत असल्याचे दर्शवणारे विद्यार्थ्यांचे चित्र, अंतर्गत आसनव्यवस्था, प्रथमोपचार पेटी, बसमध्ये चढण्यासाठी खालची पायरी, दप्तर ठेवण्याची जागा, अग्निशमन उपकरण, आसनाच्या बाजूला हॅंडल, आसनाच्या वरील बाजूला, मागील बाजूला, उभे राहिल्यावर आधार घेण्यासाठी हॅंडल, खिडकीच्या बाहेरील बाजूला आडवे बार. 

रिक्षांवरही कारवाई
परवानगी नसतानाही रिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. फक्त तीन प्रवाशांची परवानगी असताना रिक्षात त्याहून कितीतरी जास्त विद्यार्थ्यांना कोंबले जाते. अशा रिक्षा दिसल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime on illegal school van in state