मंदिरांतील प्लॅस्टिकसाठी ट्रस्टींवर गुन्हा - कदम

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

मुंबई - मंदिर परिसरात प्लॅस्टिक आढळल्यास विश्‍वस्त आणि व्यवस्थापन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला. मंत्रालयातील दालनात बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

मुंबई - मंदिर परिसरात प्लॅस्टिक आढळल्यास विश्‍वस्त आणि व्यवस्थापन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला. मंत्रालयातील दालनात बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असताना अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः देवस्थानाच्या जवळ प्रसाद आणि पूजेच्या साहित्यासाठी प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकचे आयुक्‍त तुकाराम मुंडे यांनी मंदिर परिसरात कारवाई केली होती. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही राज्याच्या दौऱ्यावर असताना मंदिर परिसरात भेटी देत कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिर्डी आणि मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसराला भेटी दिल्या होत्या. माहूरच्या रेणुका देवी परिसरात कारवाई करताना रामदास कदम यांनी मंदिर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना पाच हजार रुपये दंड ठोठावला होता. 

पर्यावरण नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापनातील कायद्यानुसार संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी येत्या दोन दिवसांत राज्यातील सर्व देवस्थानांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या धोरणाच्या आनुषंगाने देवस्थान व्यवस्थापनाने प्लॅस्टिक मुक्‍तीबाबत कार्यवाही करणे बंधनकारक आहे, अन्यथा समितीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.
- रामदास कदम, पर्यावरणमंत्री

Web Title: Crime on trustees for plastic says ramdas kadam