शिवसेना भाजपला विचारतेय, 'हेच का तुमचं हिंदुत्व?'

वृत्तसंस्था
शनिवार, 28 डिसेंबर 2019

भाजप हिंदुत्त्ववादाचा पुरस्कार करते, मग बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीला गोळ्या घालायची भाषा का करते, या समितीचे सदस्य काय पाकिस्तानातील आहेत काय, असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

मुंबई : ज्या राज्यात भाजप सरकार असते त्या राज्यात न्याय मागणाऱ्या लोकांचेही नुकसानच आहे. भाजप सरकार असलेल्या राज्यात कोणी न्याय मागितला तर त्यांना बंदूकीच्या गोळ्याच मिळतात, अशी टीका भाजपवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीवर भाजप सरकार गोळ्या घालायची भाषा कशी करू शकते, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजप हिंदुत्त्ववादाचा पुरस्कार करते, मग बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीला गोळ्या घालायची भाषा का करते, या समितीचे सदस्य काय पाकिस्तानातील आहेत काय, असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व? असे म्हणत भाजपवर टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर उभे गोळ्या घाला, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ही संघटना भारतीय जनता पक्षाक्षी संबंधित आहे. त्यामुळे भाजप संबंधित संघटनेने अशी भाषा वापरल्यामुळे त्यांच्यावर सामनातून टीका केली गेली आहे. 

दोन लाखांची कर्जमाफी म्हणणाऱ्या सरकारनेही शेतकऱ्यांवर घातली 'ही' बंधने

असा आहे अग्रलेख...
गेल्या ६० वर्षांपासून सीमा भागातील मराठी माणूस कानडी सरकारच्या गोळ्या आणि लाठ्याकाठ्याच खात आहे. पण सीमालढा काही थांबला नाही, कारण तो सत्य आणि न्यायाचा लढा आहे. भाजप पुढाऱयांच्या तोंडी सध्या ऊठसूट गोळ्या घालण्याची भाषा वाढली आहे. हे त्यांचे वैफल्य आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनीही सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱया लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे बजावले. अंगडी हेसुद्धा बेळगावचेच आहेत. भाजपच्या राज्यात न्याय मागणाऱयांना बंदुकीच्या गोळय़ा मिळतात हे आता पक्के झाले.

बेळगाव, कारवार, भालकी, निपाणीमधल्या मराठी भाषिकांचा महाराष्ट्रात येण्यासाठीचा हा लढा आजचा नाही. तो साठ वर्षांहून जास्त जुना आहे. हे लढे चिरडले, रक्तपात केला. सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबातून नव्या लढय़ाची प्रेरणा मराठी बांधवांना मिळाली आहे. त्यात आता महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व तेही उद्धव ठाकरे आहेत. सीमा प्रश्नासाठी ६९ हुतात्म्यांचे बलिदान देणारा पक्ष राज्यात सत्तेवर आहे व काँगेस-राष्ट्रवादीचे नेते सीमाप्रश्नी शिवसेनेच्या सोबतीला आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याची भाषा ज्यांनी केली त्यांनी आधी आमच्या सीमा पार करून एक पाऊल पुढे टाकण्याची हिंमत दाखवावी. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ अंगावर येणाऱयांचा कसा फडशा पाडतात ते समजेल. महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी समन्वय मंत्री नेमले आहेत व हे मंत्री मागच्या भाजप सरकारने नेमले तसे नाहीत. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व? आता गोळ्या घालण्याची भाषा सुरू झाली. एकीकरण समितीच्या नेत्यांवर बंदूक रोखणे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या छातीवर बंदूक रोखणे. एकदा धाडस करून बघाच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criticism on BJP through Samna Editorial by Shivsena