esakal | तरुण भारत माहिती नसणे ही बौद्धिक दिवाळखोरी; राऊतांना टोला
sakal

बोलून बातमी शोधा

तरुण भारत माहिती नसणे ही बौद्धिक दिवाळखोरी; राऊतांना टोला

राष्ट्रीय बाण्याच्या ‘तरुण भारता’चं स्थान कधीही ढळणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे, अशी टीका 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर करण्यात आली आहे. 

तरुण भारत माहिती नसणे ही बौद्धिक दिवाळखोरी; राऊतांना टोला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तरुण भारत माहिती नाही, असे सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणार्‍या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल. पण तभा म्हणजे तरुण भारत हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक आहे. राष्ट्रीय बाण्याच्या ‘तरुण भारता’चं स्थान कधीही ढळणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे, अशी टीका 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर करण्यात आली आहे. 

संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरून सतत भाजपवर टीका करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदावर सतत दावा करण्यात येत असल्याने अद्याप भाजप-शिवसेनेत चर्चा झालेली नाही. तरुण भारत वृत्तपत्रातून संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आल्यानंतर त्यांनी खिल्ली उडविताना असे काही वृत्तपत्र आहे का? असे म्हटले आहे. यावरूनच आज पुन्हा एकदा तरुण भारतने राऊत यांना लक्ष्य केले आहे.

शिवसेनेची हीच ती शेवटची वेळ !

तरुण भारतने आपल्या अग्रलेखात म्हटले आहे, की एका अग्रलेखावरून एखादा माणूस इतका अस्वस्थ होईल की महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांची नावंही विस्मरणात जातील, असे आम्हाला कधीही वाटले नव्हते. वेताळाने प्रश्र्न विचारले आणि विक्रम त्यावर उत्तर देत राहिला. कारण, तो वचनांना जागणारा होता. आज महाराष्ट्राची जनता विक्रमाच्या रूपाने प्रश्र्न विचारतेय्‌ आणि त्याची उत्तरे देणं सोडून आपलं अज्ञान प्रगट करण्याचे काम कुणी करीत असेल तर ते खरंच दुर्दैवी आहे. आता यांच्या 175 आमदारांच्या पाठिंब्यावर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्र्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही संख्या यांनी कशी आणि कुठून आणली, असा प्रश्र्न त्यांनी दिल्लीत उपस्थित केला आहे. दिल्ली आणि बिहारच्या होऊ घातलेल्या आणि आगामी काळात होणार्‍या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका लढवायच्या असल्याने काँग्रेस कदापिही पाठिंबा देणार नाही, हे ठावूक असतानाही पवार ‘10, जनपथ’च्या घिरट्या घालत राहतील. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. शिवसेनेला ताटळकत ठेवणे आणि त्यातून भाजपासोबत त्यांचा दुरावा आणखी वाढवत ठेवणे हे एखाद्या चाणाक्ष राजकारण्याच्या लक्षात येऊ शकते, तर ‘क्राईम रिपोर्टर’पासून ते संपादक झालेल्यांच्या लक्षात का येऊ नये? राजकीय नेत्याने जरी भावनिक विचार केला तरी संपादकाने तो तसा कधीच करायचा नसतो. संपादक हा एकप्रकारे लोकप्रतिनिधी आहे. तो त्याच्या वृत्तपत्राच्या वाचकसंख्येचे प्रतिनिधित्त्व करीत असतो. त्यांची जनभावना टिपणे आणि ती सत्ताधार्‍यांकडून पूर्ण करवून घेणे, हे संपादकांचे आद्यकर्तव्य असते आणि ते तसे असलेही पाहिजे. तरीही ‘यांचे’ अस्वस्थ होणे आम्ही समजू शकतो. त्यातून काही तरी उत्तर द्यायचे म्हणून एखाद्या वर्तमानपत्राचे नाव ठावूक नाही, असे म्हणणेही समजू शकतो. पण, असे उत्तर देताना आपण एका पक्षाचे प्रवक्ते आहोत, याचे भानही त्या व्यक्तीला राहू नये, असे कसे होऊ शकते? हा तर असा प्रकार झाला की, राज्यात नवीन सरकार बनविण्यासाठीचे प्रयत्न करायचे आणि नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, हेच ठावूक नसायचे.

संजय राऊतांची सोशल मीडियावर धूम; मिम्सचा पाऊस!

राज्यात भाजपा वगळता कोणत्याच समीकरणाची जुळवाजुळव होऊ शकत नाही, हे जर एखाद्या शेंबड्या पोराला समजत असेल, तर ते यांना का कळू नये? वेळ अजूनही गेली नाही. जनादेशाचा सन्मान करण्याची जबाबदारी जशी भाजपाची आहे, तशीच शिवसेनेची सुद्धा आहे. जनादेशाचा अर्थ हा या दोन्ही पक्षांनी समजून घेतला पाहिजे. आणि ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला पुढे आणलेे, त्यांचीच आयुष्याची कमाई मातीमोल करण्याची तयारी जर कुणी करीत असेल, तर महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिक हे कदापिही सहन करणार नाही. राज्यातील जनतेला नुसत्या भाजपाचे सरकार नको आहे. त्यांना महायुतीचे सरकार हवे आहे. कारण, तोच त्यांनी निवडणुकीत दिलेला कौल आहे. या जनादेशाचा सन्मान करणे, ही या दोन्ही पक्षांची कथनी आणि करणी असली पाहिजे. कारण, हा केवळ जनादेशाचा नव्हे तर लोकशाहीचा सुद्धा सन्मान असणार आहे. असे झाले नाही, तर ‘विनाशकाले विपरित बुद्धी’चा दोष माथी मारून घेण्याच्या पलीकडे शिवसेनेकडे काहीही उरणार नाही.