पीकविम्याने ‘द्राक्षकोंडी’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

द्राक्ष पिकात फळछाटणीनंतर पाच ते सात दिवसांनी हवामानाची जोखीम सुरू होते. द्राक्षांची काढणी होईपर्यंत ही जोखीम कायम राहते.
- डॉ. आर. जी. सोमकुंवर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र

पुणे - हवामान आधारित पीकविम्यात द्राक्षाकरिता किमान १६ ऑक्टोबरपासून पीकविमा ग्राह्य धरणे अपेक्षित असताना ८ नोव्हेंबरपासून तो ग्राह्य धरण्यात आल्याने बागायतदारांची मोठी कोंडी झाली आहे. याच कालावधीत मोठे नुकसान झाल्याने आणि हंगाम पुरता गेल्याने द्राक्ष उत्पादकांसाठी आता पीकविमा ‘बैल गेला आणि झोपा केला’चा ठरला असून, याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

राज्य सरकारने नुकताच ३१ ऑक्टोबरला हवामान आधारित पीकविमा जाहीर केला. यात द्राक्षाचा समावेश करण्यात आला असून, ७ नोव्हेंबर (आज) ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिली आहे. पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, गारपीट व वेगाचे वारे यांच्या मुळे पिकात निर्माण होणारे जोखीम स्तर विम्यात विविध टप्प्यांत ग्राह्य धरण्यात आले आहेत. 

द्राक्षाकरिता यातील अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान आणि गारपीट हे तीनच धोके समाविष्ट आहेत. अवेळी पावसासाठी ४ मिलिमीटरपासून पुढील पावसाचा सहा टप्प्यांत नुकसानभरपाई ग्राह्य धरली असून, दैनंदिन कमी तापमान प्रकारात ३.५१ अंश सेल्सिअसपासून कमी तापमान ग्राह्य धरण्यात आले आहे आणि १ जानेवारी ते ३० एप्रिल दरम्यानचा कालावधी गारपीट प्रकारात ग्राह्य धरला आहे. मात्र, योजना लागू करताना आंबिया बहरातील फळपिकांसाठी असा उल्लेख केला आहे. तसेच ७ नोव्हेंबरला अंतिम मुदतीत अर्ज भरल्यानंतर ८ नोव्हेंबरपासून नैसर्गिक जोखीम ग्राह्य धरण्यात आली आहे. वास्तवात सर्वसाधारणपणे १५ ऑक्टोबरपूर्वी आपल्याकडे पावसाळा संपत असताना, येथून पुढील कालावधी तरी योजनेत ग्राह्य धरण्यात येणे अपेक्षित होते. गेल्या वर्षी याप्रमाणेच कालावधी ग्राह्य धरण्यात आला होता.

मात्र, तसे न होता महाराष्ट्रातील ६० टक्के बागांचे नुकसान १५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान झाल्याने वेळेत पीकविमा जाहीर झाला असता, तर द्राक्ष बागायतदारांना सर्वांत मोठा दिलासा ठरला असता, मात्र तसेच न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crop insurance grapes loss