
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
Rain : पाऊस, गारपिटीमुळं महाराष्ट्रात तब्बल 80 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान; 'या' जिल्ह्यांना सर्वाधिक फटका
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस (Rain) दोन दिवसांपासून थैमान घालतोय. या पावसामुळं हजारो हेक्टर शेतीचं मोठं नुकसान झालंय. धुळे जिल्ह्यातल्या साक्रीमध्येही गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय.
अनेक शेतकरी आपल्या शेतातल्या गारा गोळा करून बाहेर फेकताना दिसले. विदर्भात वर्ध्यातही अवकाळी पावसाचा संत्र्याच्या पिकाला फटका बसला.
उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावलीये. रब्बी पिकांव्यतिरिक्त संत्री, केळी, डाळिंब, द्राक्षे यांच्या लागवडीलाही फटका बसला आहे.
गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. कृषी विभागातील अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'आतापर्यंत 80,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पीक नुकसानीमुळं प्रभावित झालं आहे. नुकसान तपासण्यासाठी पंचनामे प्रक्रिया अद्याप सुरू आहे.'
भारतीय हवामान खात्यानं (Indian Meteorological Department) 25 मार्च रोजी पुन्हा पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवलीये. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात जवळपास पाच दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं पाऊस आणि गारपिटीमुळं पिकांचं नुकसान झालंय.
अवकाळी पावसामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय. कांद्याच्या अतिरिक्त साठ्यामुळं फेब्रुवारीच्या सुरुवातीला भाजीपाल्याची किंमत 1,100 रुपये प्रति क्विंटलवरून 450 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरली होती. राज्य सरकारनं कांद्याला 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केलं असताना विरोधी पक्ष आणि कांदा उत्पादकांनी 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटलची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचं सर्वोच्च प्राधान्य असेल. आम्ही शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी पूर्ण मदतीचं आश्वासन देतो.” पीक नुकसानीचे पंचनामे येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होतील, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.