
Maharashtra Rain: अतिवृष्टीमुळे सात लाख हेक्टरवरील पिके नष्ट
पुणे - मॉन्सूनच्या पहिल्याच तडाख्यात राज्यातील खरीप पिकांच्या झालेल्या हानीचा आकडा आता सात लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. राज्यभर पीक पंचनामे सुरू असून, त्याचा अंतिम अहवाल तयार होण्यासाठी किमान पुढील तीन आठवडे जाण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप पिके बाधित झालेल्या जिल्ह्यांची संख्या आता २४ पर्यंत पोहोचली आहे. मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे निश्चित किती नुकसान झाले याचा अंदाज बांधता येत नव्हता. गेल्या आठवड्यापर्यंत बाधित झालेल्या पिकांचे अंदाजे क्षेत्र साडेतीन लाख हेक्टरच्या आसपास होते. मात्र आता नवे अहवाल प्राप्त झाल्यामुळे आतापर्यंत झालेले नुकसान सात लाख २४ हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे.
मॉन्सूनचा सर्वाधिक तडाखा नांदेड जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यात २.९७ लाख हेक्टरवरील सोयाबीन, कापूस व फळपिके नष्ट झाली आहे. अतिवृष्टी व काही भागात पुराची तीव्रता इतकी होती, की एक हजार २४१ हेक्टरवरील शेतजमीन वाहून गेलेली आहे. नांदेड पाठोपाठ वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील नुकसान मोठे आहे.
वर्धा जिल्ह्यात एक लाख ३१ हजार हेक्टरवरील तूर, कापूस, सोयाबीन नष्ट झालेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पीकहानीचा आकडा आता एक लाख २२ हजार हेक्टरच्या पुढे गेला आहे. या जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, हळद, मूग, ज्वारी आणि भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातदेखील ५५ हजार हेक्टरवरील भात, कापूस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाला पिके अतिपावसाने बाधित झालेली आहेत. याशिवाय गडचिरोली १२६६१ हेक्टर तर भंडारा १८७२३, नागपूर २८७५२, गोंदिया ५५, वाशीम ७, बुलडाणा ६९९२, अकोला ८६४, लातूर १५, हिंगोली १५९४४, अहमदनगर २, सांगली २, पुणे १८००, जळगाव ३४, नंदुरबार १९१, धुळे २१८०, नाशिक २०८१, रत्नागिरी ३, रायगड १०५, तर ठाणे जिल्ह्यात २१ हेक्टरवरील पिके वाया गेली आहे.
‘‘अर्थात, ही आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची असून, पंचनाम्याची कामे पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीची तीव्रता स्पष्ट होईल. राज्याच्या काही भागांत पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यामुळे नुकसानीचे आकडे सतत वाढते राहू शकतात,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सव्वातीन हजार हेक्टर शेती खरडली
अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे तीन हजार ३५१ हेक्टरवरील शेतजमीन पूर्णतः खरडून अथवा वाहून गेलेली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ३२१ हेक्टर तर यवतमाळ १४२, अमरावती १२४१, नांदेड १४२९, पुणे १७५, नंदुरबार २७, तर ठाणे जिल्ह्यातील १४ हेक्टर शेतजमिनीचा समावेश आहे.
Web Title: Crops On Seven Lakh Hectares Were Destroyed Due To Heavy Rains
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..