नाशिकमध्ये कोट्यवधीचा आयटी रिटर्न गैरव्यवहार 

विनोद बेदरकर
सोमवार, 13 मे 2019

नोटाबंदीनंतर दीड वर्षे सुट्या न घेता जादा काम करून नोटा छापणाऱ्या चलार्थपत्र मुद्रणालयातील प्रेस कामगारांना प्राप्तिकर वाचविण्यासाठी सुधारित आयटी रिटर्न भरण्याचा सल्ला चांगलाच महागात पडला आहे.

नाशिक - नोटाबंदीनंतर दीड वर्षे सुट्या न घेता जादा काम करून नोटा छापणाऱ्या चलार्थपत्र मुद्रणालयातील प्रेस कामगारांना प्राप्तिकर वाचविण्यासाठी सुधारित आयटी रिटर्न भरण्याचा सल्ला चांगलाच महागात पडला आहे. प्राप्तिकर विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याने परतावा (रिफंड) मिळविण्याच्या अमिषाला बळी पडलेल्या अनेक कामगारांवर नोटा छपाई कालावधीत जेवढे कमावले, त्याहून आधिक पट गमविण्याची वेळ आली आहे. 

रिटर्न भरून परतावा मिळविण्यासाठीच्या साधारण बारा ते साडेबारा कोटींच्या सातशेहून अधिक प्रकरणाची प्राप्तिकर विभागाने विशेष आधिकारी नेमून चौकशी सुरू केली आहे. ही प्रक्रिया सुरू असल्याने तूर्तास विभागाचे अधिकारी याविषयी मौन बाळगून आहेत. रिटर्न भरून परतावा मिळविणाऱ्यांत सर्वाधिक नाशिक रोडचे प्रेस कामगार आहेत. दीड वर्षे जादा काम करून नोटा छापणाऱ्या कामगारांना त्याबदल्यात घसघशीत मोबदला मिळाला. मात्र, जेवढे जास्त उत्पन्न तेवढा जादा प्राप्तिकर कापला गेला. मग रिटर्न भरून परतावा मिळविण्याच्या प्रयत्नातून गैरव्यवहार जन्माला आल्याची चर्चा आहे. दरम्यान, या चौकशीचा कामगारांनी चांगलाच धसका घेतला आहे. 

काय आहे प्रकरण 
जादा कामामुळे प्रेस कामगारांचे वार्षिक उत्पन्न वाढल्याने प्राप्तिकर विभागाने तितकाच घसघशीत प्राप्तिकर कापून घेतला. सरासरी अडीच ते तीन लाखांच्या आसपास कर  कापून गेल्यानंतर तो वाचविण्यासाठी काही लेखा परीक्षकांनी दिलेले भन्नाट फंडे चौकशीत पुढे आले असून, त्यातून प्रेस कामगारांमागे चौकशीचे लचांड लागले आहे. काहींनी 20 ते 25 हजार रुपये फीच्या मोबदल्यात लाख ते दीड लाखापर्यंत रिफंडही मिळवले. त्यावरून सुधारित आयटी रिटर्न भरण्याची शक्कल काहींनी लढवली. एकाचवेळी शेकडो लोकांना रिफंड मिळू लागल्याने प्राप्तिकर विभागाला शंका आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. 

कामगारांना नोटिसा पाठविल्या आहेत. चौकशी झाल्यानंतर आमचे प्राप्तिकर विभागाचे वरिष्ठ याविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील. चौकशी सुरू असल्याने त्याविषयी 
काहीच सांगता येणार नाही. 
- धनराज बोराडे, चौकशी अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crores of IT returns fraud in Nashik