esakal | शांतता, संचारबंदी लागू आहे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

शांतता, संचारबंदी लागू आहे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई

शांतता, संचारबंदी लागू आहे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई

sakal_logo
By
सूरज यादव

मुंबई - ‘ब्रेक द चेन’मधील (Break The Chain) निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलिस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यच्या सूचना दिल्या. राज्यात (Maharashtra) दोन आठवड्यांचा ‘ब्रेक द चेन’ या कडक निर्बंधांना आज रात्री ८ वाजल्यापासून सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी काल (ता. १३) जनतेशी संवाद साधताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. आज नियमांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलिस अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. त्या वेळी अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बैठकीस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, तसेच राज्याच्या व जिल्ह्यांच्या टास्क फोर्सचे डॉक्टर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: राज्यात लॉकडाऊन सदृश्य कठोर निर्बंध लागू; काय सुरु? काय बंद?

सर्वांना मदत पोहोचवा

राज्य शासनाने दुर्बल घटकातील व गरीब लोकांसाठी जाहीर केलेले आर्थिक साहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे, तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. याप्रसंगी मंत्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, राजेश टोपे यांनी देखील आपल्या सुचना मांडल्या. राज्याच्या टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, तात्याराव लहाने यांनीही रेमडेसिव्हिरचा अनावश्यक वापर टाळावा, हे सांगताना ऑक्सिजन सांभाळून व गरजेप्रमाणेच वापरावा अशी सूचना केली.

पासची गरज नाही

संचारबंदी लागू केल्याने नागरिकांनी सहकार्य करावे. आम्ही कोणालाही अकारण त्रास देणार नाही, याची हमी देतो; पण जाणूनबुजून संचारबंदीचा भंग करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी केले. अत्यावश्यक काम असेल तर पासशिवाय तुम्ही बाहेर पडू शकता, पण कारण नसताना बाहेर पडल्यास कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: पुण्यात 'ब्रेक द चेन'ला सुरुवात; अत्यावश्यक सेवांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश?

रत्नागिरीत प्रवेशासाठी चाचणी बंधनकारक

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांमध्ये संसर्गात वाढ झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची आधी कोरोना चाचणी घेण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्याच्या सीमांवर तसेच रेल्वे, बस स्थानक येथील प्रवाशांची तपासणी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

सुविधा तपासा

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘कोरोना विषाणूचे म्युटेशन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टरांनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे, ते राज्याच्या तज्ज्ञ टास्क फोर्सकडून समजून घ्यावे.’’ ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर, तसेच रेमडेसिव्हिरसंदर्भात काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाहीत, ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा ऑडिट त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कन्टेन्मेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.