नोटाबंदीने घटला तिळगुळाचा गोडवा

नोटाबंदीने घटला तिळगुळाचा गोडवा
नोटाबंदीने घटला तिळगुळाचा गोडवा

पुण्यातून मुंबई-गोव्यासह ठिकठिकाणी जाणाऱ्या तिळगुळाच्या मागणीत 25 टक्के घट

पुणे : 'तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला' असं म्हणत संक्रांतीचा गोडवा वाढविणाऱ्या तिळगुळाचा गोडवा यंदा नोटाबंदीमुळे कमी झाला आहे. मुंबई-गोव्यासह ठिकठिकाणी पुण्यातून जाणाऱ्या तिळगुळाची मागणी यंदा 25 टक्‍क्‍यांनी घटली आहे.
संक्रांतीमुळे हलवा बनविण्याच्या कामाला शहरात ठिकठिकाणी वेग आला आहे.

तिळाचा समावेश असलेले काटेरी तिळगूळ हे पुण्याचे वैशिष्ट्य. त्यामुळे त्याला सर्वत्र मागणी असते. गोवा, मुंबईला दरवर्षी हे तिळगूळ विक्रीसाठी पाठवले जातात. मागील हंगामात गोव्यातून 5 हजार किलो तर मुंबईतून 25 हजार किलो हलव्याची मागणी होती. मात्र, नोटाबंदीमुळे या मागणीत 25 टक्के घट झाल्याची माहिती हलवा व तिळगुळाच्या पुण्यातील व्यापाऱ्यांनी दिली.

अन्य ठिकाणच्या तिळगुळात केवळ साखरेचा समावेश असल्याने, तसेच त्यांच्यातील शुभ्रतेचे प्रमाण कमी असल्याने त्यांना फार मागणी नसते. पुणेरी हलवा मात्र त्याच्या शुभ्रतेमुळे तसेच त्यातील तिळाच्या समावेशामुळे प्रसिद्ध आहे. "ब्रॅंडेड' तिळगूळ म्हणूनही त्याची ओळख आहे.

शुक्रवार पेठेसह नाना पेठ, फडके हौद व रविवार पेठेतील नेहरू चौकात हलवा बनविण्यात येतो. मुंबई, गोव्यासह नाशिक, सातारा आणि विदर्भ-मराठवाड्यातही त्याला मागणी असते. हंगामात सर्वांचा मिळून 50 हजार किलो हलवा बनतो. यंदा मात्र हे उत्पादन 35 हजार किलोपर्यंत घटणार आहे.

असा तयार होतो तिळगूळ
तिळगुळांना पांढराशुभ्र रंग येण्यासाठी सुरवातीस मोठ्या लोखंडी कढईत उकळणाऱ्या पाकावरील मळी काढण्यात येते. त्यानंतर मोकळ्या जागेत विजेवर चालणाऱ्या तांब्याच्या हांड्याच्या मशिनमध्ये तीळ टाकण्यात येतात. त्यावर साखरेच्या पाकाची धार सोडण्यात येते. गरगर फिरणाऱ्या हांड्यातील तीळ आणि पाक गोल होऊन काटेरी आकार घेतात. आणि हळूहळू लहान-मोठ्या स्वरूपातील तिळगूळ तयार होतात. ही प्रक्रिया चार तासांची असते. एका केंद्रात मशिनद्वारे एका दिवसात 800 ते 1 हजार किलो हलवा तयार होतो. काटेरी तिळगूळ, नरम व कडक तिळवडी, तिळाचे लाडू, दागिने असे हलव्याचे प्रकार आहेत.

कसबा पेठेत शंकर ढेंबे यांनी 1952 च्या सुमारास कसबा गणपतीच्या मागे हाती हलवा बनविण्यास सुरवात केली. त्या वेळी 35 ते 40 महिला दोन शिफ्टमध्ये काम करून हलवा बनवीत असत. त्यानंतर प्रभाकर (काका) आणि आता मी हा वारसा यशस्वीपणे चालवीत आहे. 20 वर्षांपूर्वी हातानेच हलवा बनविण्यात येत होता. त्यानंतर मागणी वाढल्याने तो मशिनवर बनविण्यास सुरवात केली.
- महेश ढेंबे, हलवा व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com