ग्राहकांना मिळणार अचूक बिल 

सुजित गायकवाड
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नवी मुंबई  - महावितरणने सुरू केलेली मध्यवर्ती बिल वाटप योजना बुधवारपासून (ता. 1) शहरी भागात सुरू झाली आहे. यात एकाच तारखेला वीज बिलांचे रिडिंग घेतल्यावर एकदाच बिल प्रिंट करून तात्काळ ग्राहकांना वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल मिळणार असल्याने वाढीव आणि दंडाच्या पैशांवरून अधिकाऱ्यांसोबत होणारे वाद संपुष्टात येणार आहेत. 

नवी मुंबई  - महावितरणने सुरू केलेली मध्यवर्ती बिल वाटप योजना बुधवारपासून (ता. 1) शहरी भागात सुरू झाली आहे. यात एकाच तारखेला वीज बिलांचे रिडिंग घेतल्यावर एकदाच बिल प्रिंट करून तात्काळ ग्राहकांना वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल मिळणार असल्याने वाढीव आणि दंडाच्या पैशांवरून अधिकाऱ्यांसोबत होणारे वाद संपुष्टात येणार आहेत. 

राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या वीजबिल देयकांच्या पद्धतीमुळे काही ग्राहकांना चुकीची बिले जात होती. त्यावरून ग्राहक आणि अधिकारी यांच्यात अनेकदा वाद होत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना रिडिंग तपासून पुन्हा नवीन बिले द्यावी लागत होती. त्यावर आता महावितरणने तोडगा काढला आहे. आता महिन्याची एखादी तारीख निश्‍चित करून दरमहिन्याला त्याच तारखेला वीजमीटरचे रिडिंग घेतले जाणार आहे. तसेच ही रिडिंग ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरही मिळणार आहे. महावितरणने याला "डे टू डे रिडिंग' असे नाव दिले आहे. या रिडिंगमुळे एकदाच 3 ते 4 हजार ग्राहकांचे घेतलेले रिडिंग नोंदवून मध्यवर्ती बिल केंद्राकडे पाठवले जाणार आहे. या ठिकाणी देयकांची रक्कम ठरवून एकाच वेळेला सर्व देयके छापण्यासाठी देऊन नंतर ती बिले तात्काळ ग्राहकांना पाठवण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत रिडिंग घेतल्यापासून दोन ते तीन दिवसांच्या अवधीत ग्राहकांना घरी किंवा ऑनलाईन पद्धतीने बिल मिळणार आहे. ही योजना बुधवारपासून नवी मुंबईसह भांडुप, ठाणे, कल्याण, नाशिक, पुणे व रायगड जिल्ह्यातील पनवेल यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये लागू झाली आहे. 

होणारे फायदे 
- ग्राहकांना बिले वेळेवर मिळणार 
- 30 दिवसांच्याच रिडिंगचे अचूक बिल येणार 
- जादा वीज बिलामुळे होणारे वाद टळणार 
- ग्राहकांच्या मोबाईलवर रिडिंग माहिती 
- थकबाकीचे प्रमाण घटणार 

कशी असेल पद्धत 
महावितरणकडून एरवी ठराविक भागातील मीटर रिडिंग त्यांच्या सवडीनुसार घेतले जात होते. नंतर ते तपासून आल्यावर बिले छापण्यासाठी पाठवण्यात येत होती. बिले छापून आल्यावर ग्राहकांना रिडिंग घेतल्यापासून 15 दिवसांनंतर ती मिळत होती. मात्र आता मध्यवर्ती बिल देयकांमुळे रिडिंग घेण्याची तारीख निश्‍चित केली जाणार आहे. त्याच तारखेला रिडिंग घेतल्यानंतर ती तपासणीसाठी पाठवण्यात येईल. तीन स्तरांवरून बिल तपासून गेल्यामुळे ग्राहकांच्या हातात अचूक बिल पडेल.

Web Title: Customers get the correct bill

टॅग्स