
Monsoon Update : अरबी समुद्रात चक्रीवादळाचे मॉन्सूनवर सावट; हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली : आग्नेय अरबी समुद्रात गुजरातेतील पोरबंदरच्या दक्षिणेला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते वायव्येकडे सरकून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते, अशी माहिती हवामान खात्याने दिली. याचा परिणाम मॉन्सूनच्या वाटचालीवर होऊ शकतो.
या चक्रीवादळाला बांगलादेशने सुचविलेले ‘बिपरजॉय’ हे नाव देण्यात येईल. हवामान खात्याच्या निवेदनात म्हटले आहे, की सध्या हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात गोव्यापासून ९५० कि.मी. तर मुंबईपासून १,१०० कि.मी. अंतरावर आहे.
त्याचप्रमाणे ते पोरबंदरच्या दक्षिणेला १,१९० आणि पाकिस्तानातील कराचीपासून १,४९० कि.मी.वर आहे. या चक्रीवादळाची तीव्रता वाढून गुरुवारी (ता.८) त्याचे तीव्र चक्रीवादळात तर शुक्रवारी (ता.९) संध्याकाळपर्यंत अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
केरळ-कर्नाटक किनारपट्टीसह लक्षद्वीप-मालदीव आणि कोकण गोव्याच्या किनारपट्टीवर आठ ते दहा जून दरम्यान समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. यंदा मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले आहे.
साधारणतः उद्या (ता.८) मॉन्सून अरबी समुद्रात येण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविली आहे. अरबी समुद्रातील संभाव्य चक्रीवादळामुळे मॉन्सूनची वाटचाल मंदावली आहे. कमी दाब क्षेत्राने केरळजवळील ढग खेचून घेतले आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक स्थिती नाही.
या चक्रीवादळाच्या वाटचालीवरच मॉन्सूनचे केरळातील आगमन व पुढील प्रगती ठरणार आहे. हवामान खात्याकडून मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाची नेमकी तारीख देण्यात आलेली नाही. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने मॉन्सून केरळमध्ये आठ किंवा नऊ जूनला येण्याची शक्यता वर्तविली असून त्याचे आगमन सौम्य असेल. अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मॉन्सूनचे वारे केरळच्या किनारी भागात पोचल्यावर ते सहजासहजी पश्चिम घाट ओलांडू शकणार नाहीत, असाही संस्थेचा अंदाज आहे.
दोन-तीन दिवसांत केरळमध्ये मॉन्सून
हवामान खात्याचे वरिष्ठ वैज्ञानिक डी.एस.पै म्हणाले, की केरळमध्ये सोमवारी (ता.५) चांगल्या पावसाची नोंद झाली. येत्या दोन-तीन दिवसांत केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे केरळमध्ये एक जून रोजी मॉन्सूनचे आगमन होते. यावर्षी चार जूनला मॉन्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.
मॉन्सूनची निश्चित तारीख जाहीर नाही
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा मॉन्सूनच्या वाटचालीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. यामुळे मॉन्सूनचे आगमन आणखी लांबू शकते अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होते आहे.
किनाऱ्याला समांतर दिशेने जाणाऱ्या या चक्रीवादळाची तीव्रतादेखील वाढणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच उद्या (ता. ८)पासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ८ ते १० जून या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.