दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरण : सत्ताधाऱ्यांनीही तपासात सहकार्य करावे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान धागेदोरे तपास यंत्रणांना सापडले आहेत, अशी माहिती तपास यंत्रणांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. 

दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवर आज न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआय आणि पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या विशेष सीआयडी पथकाने तपासाचा सीलबंद अहवाल न्यायालयात दाखल केला. येत्या काही दिवसांतच सीबीआय एक तपास मोहीम हाती घेणार असून, त्यासाठी काही सरकारी परवानगी घेणे सुरू आहे, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी खंडपीठाला सांगितले. हत्याकांडामध्ये वापरण्यात आलेल्या चार पिस्तुलांचा तपास करणार आहेत. हत्येनंतर संबंधित हत्यारांची मोडतोड करून ती ठाण्याच्या खाडीत टाकण्यात आली होती, असे सीबीआयने सांगितले. मात्र याबाबत पावसाळ्यापूर्वी शोध घ्या, असे निर्देश न्यायालयाने दिले. पानसरे हत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला अटक केली असली, तरी अद्यापही हल्लेखोरांना अटक केली नसल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तपास सुरू असला तरी त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले. 

न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, मुख्य सचिवांनी तपास यंत्रणांची बैठकही घेतली होती. राज्य सरकारने या प्रकरणात तपास यंत्रणांना सर्वतोपरी साह्य करावे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्याचा आणि शांततेचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय नेत्यांनी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करावी, असेही न्यायालयाने सांगितले. याचिकांवर पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dabholkar and Pansare murder case The ruling party should also cooperate with the investigation says court