दादर-पुणे स्टेशन तिकीट फक्त ४४० रुपये; नवे तिकीट दर ८ जुलैपासून लागू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

गेली १५ वर्षे मुंबई-पुणे मार्गावर अत्यंत लोकप्रिय असलेली एसटीची 'शिवनेरी' ही बस सेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी आहे.

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठीत सेवा म्हणून नावलौकीक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत भरगोस कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवारपासून (ता. ८ जुलै) लागू होणार आहेत.

गेली १५ वर्षे मुंबई-पुणे मार्गावर अत्यंत लोकप्रिय असलेली एसटीची 'शिवनेरी' ही बस सेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी आहे. सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ७ मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या केल्या जातात. याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली जात आहे. या प्रतिष्ठीत बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही बस सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त प्रवासी संख्या वाढवणे, हा तिकीट दर कमी करण्याचा उद्देश असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. मागील काही काळात मुंबई-पुणे  मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला, उबेरसारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तिकीट दर कमी केल्यामुळे हा प्रवाशी वर्गसुद्धा शिवनेरीकडे वळेल.

एस.टी. महामंडळाच्या वाहतूक विभागाने सध्या प्रवाशांना या मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून स्पर्धात्मक तिकीट दर कपातीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार लवचिक भाडेवाढ अथवा कपातीच्या संदर्भात एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार ही दर कपात करण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून कमी झालेले नविन तिकीट दर लागू होतील, अशी माहिती एस.टी. प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dadar to Pune station ticket for only Rs 440 New ticket rates will be apply from July 8