दुग्धव्यवसायाला नवीन वर्षात चांगले दिवस येणार;शेतकऱ्यांसाठी व्यवसाय ठरणार फायदेशीर 

दुग्धव्यवसायाला नवीन वर्षात चांगले दिवस येणार;शेतकऱ्यांसाठी व्यवसाय ठरणार फायदेशीर 

वालचंदनगर - कोरोना व लॉकडाउनमध्ये गटकाळ्या खाणाऱ्या दुग्धव्यवसायाला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून चांगले दिवस येणार आहेत. येत्या १ जानेवारीपासून ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला २७ रुपये ५० पैसे दर मिळणार असून, शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरणार आहे. 

कोरोनाच्या महामारीमुळे मार्च महिन्यामध्ये लॉकडाउनला सुरवात झाली. त्यामुळे सर्व बाजारापेठा व कार्यक्रम बंद झाल्या. त्यातून दूध व दुग्धजन्य पदार्थाची विक्रीमध्ये वेगाने घट झाली. दुग्धजन्यपदार्थाची मागणी घटली असली तरीही दुधाचे उत्पादन कमी झाले नाही. त्यामुळे दुधाचे दर टप्प्याने कमी होऊन १७ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले होते. कोरोना व लॉकडाउन गंभीर परिणाम शेतकऱ्यांच्या दुधाच्या धंद्यावर झाला. शेतकऱ्यांना तोट्यामध्ये दुधाचा धंदा करावा लागला. अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय परवडत नसल्यामुळे दूध विकण्याऐवजी गायीच विकल्या. जून, जुलै महिन्यामध्ये दुधाच्या दरामध्ये समाधानकारक वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायाकडे दुर्लक्ष केले. दरवर्षी पावसाळ्यानंतर वाढणारा दुग्धव्यवसाय चालू वर्षी वाढलाच नाही. याचा चांगला परिणाम दुधाच्या दरावरही होऊ लागला असून, दुधाचे दर वाढत चालले आहेत. 

सध्या दुग्धजन्य पदार्थ व दुधाला मागणी वाढल्यामुळे दुधाचे दरामध्ये वाढ झाली. १ जानेवारीपासून ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला २७ रुपये ५० पैसे दर मिळणार आहे. सध्याच्या दराच्या तुलनेमध्ये प्रतिलिटरला दीड रुपयांची वाढ होणार आहे. 

‘नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठी फायदेशीर’ 
दूध पावडर व बटरचे दर गेल्या सहा महिन्याच्या तुलनेमध्ये वाढले आहेत. सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोनानंतरची अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरु झाल्यास दुधाचे दरामध्ये वाढ होईल. नवीन वर्षात दुधाला यापेक्षा ही चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असून शेतकऱ्यांसाठी दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरणार आहे. 
- दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई डेअरी 

कोरोना व लॉकडउनमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, लग्नसमारंभ शाळा व सर्व व्यवसाय बंद होते. मात्र, सध्या कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. सर्व व्यवसाय व उद्योगधंदे जोमाने सुरु आहेत. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढली असून, दुधाचे दर वाढले आहेत. उत्तर व दक्षिण भारतामधून दूध व दुग्धजन्य पदार्थाला मोठी मागणी आहे. 
- अर्जुन देसाई,  कार्यकारी संचालक, नेचर डेअरी 

लॉकडाउनच्या काळामध्ये दुधाचे दर कमी झाल्यामुळे दुग्धउत्पादक शेतकरी देशोधडीला लागले होते. तोट्यामध्ये दूधधंदा करावा लागला. नवीन वर्षात वाढणारा दुधाच्या दरामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये दोन पैसे राहणार आहेत. 
- लखन साळुंके, दुग्धउत्पादक शेतकरी, रणगाव (ता. इंदापूर) 

दूध व्यवसायातील ठळक बदल 
- १ जानेवारीपासून ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणवत्ता असलेल्या दुधाला प्रतिलिटर मिळणार २७ रुपये ५० पैसे दर. 
- कोरोना व लॉकडाउनमुळे दुधाच्या दरात प्रतिलिटर १७ रुपयांपर्यंत घसरण. 
- दुधाचा दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून दुग्धव्यवसायाकडे दुर्लक्ष. 
- पावसाळ्यानंतर दरवर्षीप्रमाणे दुग्धव्यवसायात अपेक्षीत वाढ नाही. 
- उत्तर व दक्षिण भारतामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या मागणीमध्ये वाढ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com