नाशिक : ‘डाळिंब पंढरी‘ उद्‌ध्वस्त होणार ?

तीन हजार कोटींचे उत्पादन ८०० कोटींवर ; पर्यायी फलोत्पादनाचा मार्ग अवलंबला
dalimb Pandhari sangola taluka Will destroyed nashik
dalimb Pandhari sangola taluka Will destroyed nashiksakal

नाशिक : महाराष्ट्राची ‘डाळिंब पंढरी’ म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका ओळखला जातो. ही ‘डाळिंब पंढरी’ उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जमीन आणि हवामानाच्या जोरावर सांगोला तालुक्यासह परिसरात डाळिंबामुळे दुष्काळी भागाला वरदान मिळाले होते. २००० पासून डाळिंब लागवडीचे क्षेत्र वाढले. गेल्या दोन वर्षांपासून मेपासून पावसाला सुरवात झाली आणि गेल्यावर्षी तर डिसेंबरअखेरपर्यंत पाऊस होता. कुजवा, तेलकट डाग, मररोगाचे संकट सहन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बागांमधील झाडे पीन होल बोअर रोगाने वाळत आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाचे उत्पादन ३ हजार कोटींवरून ८०० कोटींपर्यंत घसरले आहे.

डाळिंबाच्या बागा काढण्याचा सपाटा सुरु असल्याने सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाचे उत्पादन पुढील वर्षी ४०० कोटी रुपयांपर्यंत तरी मिळते की नाही?, हा प्रश्न आहे. सांगोला तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र १९ हजार हेक्टरपर्यंत आहे. त्यापैकी ६० टक्के बागा काढून टाकल्या गेल्या. सोलापूर जिल्ह्यातील ४९ हजार हेक्टरपैकी ५० टक्के बागा काढल्या गेल्यात. शिवाय २० ते २५ टक्के बागा काढण्याच्या मन:स्थितीत शेतकरी आहेत. डाळिंबाच्याऐवजी शेतकऱ्यांनी पर्यायी फलोत्पादनाचा मार्ग अवलंबला आहे.

आंबा, पेरु, सीताफळ, केळीचा पर्याय

शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या जागेला आंबा, पेरू, सीताफळ, केळीच्या लागवडीचा पर्याय निवडला आहे. शेती करणे शक्य होत नसलेल्या शेतकऱ्यांनी चिंचेची लागवड केली आहे. नव्याने डाळिंबाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे. म्हणजेच काय, तर डाळिंबाची पंढरी आता अंतिम श्‍वास घेऊ लागल्याचे चित्र पाहावयास मिळते.

शेतकऱ्यांनी शोधली बांगलादेशची बाजारपेठ

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी एकीकडे लागवडीची चळवळ उभी करत असताना देशातंर्गत आणि परदेशातील बाजारपेठ शेतकऱ्यांनी शोधली. गेल्यावर्षी बांगलादेशमध्ये ७० टक्के डाळिंबाची निर्यात झाली. पूर्वी खूपच कमी निर्यात बांगलादेशमध्ये व्हायची. डाळिंबाची ७० ते ८० हजार टनांपर्यंत निर्यात व्हायची. त्यात युरोपमध्ये होणाऱ्या निर्यातीचे प्रमाण १५ हजार टनापर्यंत असायची. प्रत्यक्षात युरोपमधील निर्यात ५०० टनापर्यंत घसरली आहे. आता राजस्थान आणि गुजरातमधील डाळिंब आखाती देशात पाठवण्यात आल आहे. डाळिंबाच्या उत्पादनाचा प्रश्‍न तयार झाला असताना डाळिंबाच्या पंढरीत प्रक्रिया उद्योगाची काय स्थिती आहे? याची माहिती घेतल्यावर प्रक्रिया उद्योगाला फारशी चालना मिळाली नसल्याचे उत्तर मिळाले.

डाळिंबाची नव्याने लागवड करण्यासाठी जमिनीला दोन वर्षांची विश्रांती द्यावी लागेल. अन्यथा नवीन जमिनीत डाळिंबाची लागवड करावी लागेल. नव्याने डाळिंबाची लागवड करून दोन वर्षांनी येणाऱ्या उत्पादनाचा हेक्टरी खर्च सात लाख रुपयांपर्यंत पोचला आहे. सद्य:स्थितीत फळबाग लागवडीचे सरकारचे धोरण पाहता, सर्वसामान्य शेतकऱ्यांना डाळिंबाच्या लागवडीचा इतका मोठा खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे सरकारच्या स्तरावरून डाळिंब लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी धोरण अपेक्षित आहे.

- प्रभाकर चांदणे, (अध्यक्ष, डाळिंब उत्पादकांची संघटना)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com