धरणे, तलावांतील पाणी पिण्यासाठीच वापरावे - सचिव मदान

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 एप्रिल 2019

राज्यात पाणीटंचाई तीव्र होऊ लागली असून 3,379 गावे आणि 7,856 वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील धरणे व तलावांतील पाण्याचा वापर प्राधान्याने पिण्यासाठीच करावा अशा सक्‍त सूचना मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांनी दिल्या आहेत.

मुंबई - राज्यात पाणीटंचाई तीव्र होऊ लागली असून 3,379 गावे आणि 7,856 वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील धरणे व तलावांतील पाण्याचा वापर प्राधान्याने पिण्यासाठीच करावा अशा सक्‍त सूचना मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांनी दिल्या आहेत. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या फेऱ्यांबाबत जीपीएसच्या साह्याने गटविकास अधिकाऱ्यांनी दररोज संनियंत्रण करावे, असेही त्यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या अनुषंगाने मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्‍यामलाल गोयल उपस्थित होते. मुख्य सचिवांनी टंचाईची परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

राज्यात सध्या 4,329 टॅंकरद्वारे 3,379 गावे आणि 7,856 वाड्यांवर पाणीपुरवठा केला जातो. राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या आढावा घेऊन मुख्य सचिव म्हणाले, की सध्या टॅंकर ज्या ठिकाणांवरून भरले जातात तेथे पिण्याचे पाणी किती कालावधीसाठी उपलब्ध होऊ शकेल, याचा आढावा यंत्रणेने तातडीने घ्यावा. त्याचबरोबर अन्य कुठल्या स्रोतावरून पाणी उपलब्ध होऊ शकेल याबाबतची खातरजमा उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी करावी. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅंकर मंजूर आहेत, तेथे जीपीएसच्या साह्याने मंजूर फेऱ्यांनुसार पाणीपुरवठा होत आहे की नाही, याबाबत गटविकास
अधिकाऱ्यांनी दैनंदिन माहिती घ्यावी आणि आवश्‍यक त्या प्रमाणात पाणीपुरवठा होईल यासाठी प्रयत्न करावेत.

पाणीटंचाईच्या अनुषंगाने तात्पुरती पूरक पाणीपुरवठा योजना व नळ योजनांची विशेष दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे तेथे योजनांची कामे मुदतीत पूर्ण करून गावे व वाड्यांना पिण्याचे उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी, असेही मदान यांनी या वेळी
सांगितले.

टॅंकरवर अवलंबून...
3,379 - गावे
7,856 - वाड्या

Web Title: Dam Lake Water Drinking UPS Madan