शिवार नासलं; सणाच्या तोंडावर पावसामुळे नुकसान 

Damage to crop due to rainfall
Damage to crop due to rainfall

पुणे-  राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार हजेरी लावत खरीप पिकांना आज दणका दिल्याने सणासुदीच्या तोंडावर शिवार नासले गेले. 

मराठवाडा कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. खरिपाच्या काढणीस आलेल्या पिकांचे  भिजून मोठे नुकसान झाले. काढून ठेवलेली सोयाबीन, भात, कापूस, ज्वारी पिके पाण्यात गेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. 

जालना जिल्ह्यातील सातोना येथे १७४ मिलिमीटर, लातूर जिल्ह्यातील तांदूळजा येथे १७० मिलिमीटर, परभणी जिल्ह्यातील देऊळगाव (ता.सेलू) येथे १६५, तर सेलूत १५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातील परभणी, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील १६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. ओढे, नाले, नद्यांचे पाणी पिकांमध्ये शिरल्याने सोयाबीन, कपाशी, ज्वारी, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले. सेलू तालुक्यातील सर्व पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. जालन्यातील वाघ्रुळ जहागीर, दाभाडी, हसनाबाद, परतूर, सातोना व श्रीष्टी येथे अतिवृष्टी झाली. सातोना येथे १७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर तालुक्यातील तांदूळजा महसूल मंडळात १७० तर चिंचोली महसूल मंडळात ११२ मिलिमीटर पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे या मंडळातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे मांजरा नदीलाही पाणी आले आहे. या पाऊस रब्बीसाठी चांगला असला तरी खरिपातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील पूर्णा नदीवर असलेले घुंगशी बंधारा भरल्याने नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात भिजल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेतात काढणीनंतर मळणीसाठी गंजी लावून ठेवलेले सोयाबीन पीक भिजले आहे. 

सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सर्वच पाणीच पाणी झाले असून, काढणीला पिकांत साचल्यामुळे नुकसान सुरू आहे. सध्या खरिपातील पिकांची काढणी सुरू असून, शेतातील कामे ठप्प झाली आहेत. सोयाबीन, भात, स्ट्रॉबेरी, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढे-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडून जवळच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान केले. सोयाबीन भिजले असून ज्वारी काळी पडू लागली. आले व हळदीच्या पिकांत पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. 

पुणे जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस पडत असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वीर, घोड, नाझरे, उजनी, भामा आसखेड या धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसणार आहे. काढणीस आलेले सोयाबीन, मका, बाजरीसह, भुईमूग, बटाटा, फुलशेती भाजीपाला पिकांत पाणी साचल्याने मोठे नुकसान होणार आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. अतिवृष्टी अकोले तालुक्यात भातासह जिल्हाभरात काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. शनिवारी दिवसभर अनेक ठिकाणी पाऊस पडला. कर्जत, शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले भागात झालेल्या पावसामुळे कापूस, बाजरी, भाताचे नुकसान होत आहे. मात्र रब्बीतील ज्वारीसह अन्य पेरणीला वेग येण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतीकामाचे नियोजन विस्कळित झाले आहे. संततधार पावसामुळे सुरू असलेली खरीप पिकांच्या मळणीची कामे ठप्प झाली आहेत. येत्या काही दिवसांत या पावसाचा विपरीत परिणाम शेतीच्या सर्व कामावर होणार आहे. काढणीला आलेली खरीप पिके तशीच शेतात राहिल्याने ती कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गुऱ्हाळांनाही बसत आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात गेले चार ते पाच दिवस जिल्ह्यात पडलेल्या पावसाने कापणीला आलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेकडो एकर उभी शेतं आडवी झाली आहेत. भातामध्ये दाणे भरले असून, पावसात भिजल्याने संपूर्ण पीक शेतात आडवे होते. शेतात पाणी साचले असल्याने भाताचे दाणे पाण्यात भिजून मोड फुटण्याची भीती आहे. 

वादळी पावसाचा इशारा कायम
अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात पावसाने जोर धरला आहे. राज्यात आज (ता.२१ ) मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यापासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पावसाचा जोर मंगळवारपर्यंत (ता. २२) राहण्याची शक्यता हवामान विभागाने 
वर्तविली आहे. 

पावसाने दाणादाण
लातूर, परभणी, जालन्यात अतिवृष्टी
जालन्यातील सातोना येथे १७४ मिलिमीटरची नोंद
सोयाबीन, भाताला मोड फुटण्याची भीती
ज्वारी, बाजरी कापसासह खरिपाच्या पिकांचे नुकसान
ओढे, नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com