'दानवे यांची महाविद्यालये बोगस '

तुषार खरात, संजीव भागवत
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंबई - ""भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे सोयगाव (औरंगाबाद) येथील महाविद्यालय शोधूनही सापडणार नाही. महाविद्यालयासाठी साधी खोलीसुद्धा उपलब्ध नाही, तरीही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वतःच्या अधिकारात या महाविद्यालयाला मान्यता दिली आहे. अन्य दोन महाविद्यालयांसाठीही पायाभूत सुविधांची वानवा आहे. सुविधांचा अभाव असतानाही या महाविद्यालयाला मान्यता दिली,'' असा आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ""तावडे यांच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे,'' असे सत्तार यांनी सांगितले. 

""घाऊक पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिल्याचे मी गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच पाहतोय. सत्तेचा गैरवापर करून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महाविद्यालयांचे मनमानी वाटप अयोग्य आहे,'' असेही सत्तार म्हणाले.  याबाबत रावसाहेब दानवे यांना संपर्क साधला असता, "माहिती घेऊन सांगतो,' असे ते म्हणाले. 

चौकशी करा 
""विद्यापीठांनी अपात्र ठरवलेले व अधिकाऱ्यांनी नाकारलेले प्रस्ताव तावडे यांनी मंजूर करून भाजपच्या नेत्यांना महाविद्यालये दिली. हे प्रकरण गंभीर असून याची चौकशी झाली पाहिजे,'' अशी मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केली.  ""कोणत्याही महाविद्यालयांना मान्यता देण्यासाठी त्या- त्या विद्यापीठांनी मंजूर केलेल्या बृहतआराखड्यांनुसारच मान्यता दिली जाते; पण तावडे यांनी बृहतआराखड्यापासून ते विद्यापीठ कायद्यालाही धाब्यावर बसवून आपल्या पक्षांच्या मंडळींना महाविद्यालयांची खिरापत वाटली आहे. यातून सरकारची आणि तावडे यांचीही पारदर्शकता राज्यातील जनतेसमोर आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन वास्तव राज्यातील जनतेच्या समोर आले पाहिजे,'' असेही काळे यांनी म्हटले आहे. 

राज्यातील प्राध्यापक संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या एमफुक्‍टो संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब साळवे यांनीही याविषयी तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ""जिथे गरज आहे, तिथे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या संस्था असतानाही मान्यतेस नकार देण्यात आला असून हे राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताविरोधात आहे. भिवंडी तालुक्‍यात विधी महाविद्यालय नसतानाही तिथे मान्यता दिली गेली नाही, मात्र मुंबईत गरज नसतानाही तिथे मान्यतेची खिरापत वाटली. "सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम'ने तावडे यांच्या बोगस कारभाराचाच पर्दाफाश केला आहे. त्यामुळे आता तावडे यांचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा,'' अशी मागणीही डॉ. साळवे यांनी केली. 

""मुख्यमंत्र्यांनी तावडे यांच्याविरोधात तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन केले जाईल,'' असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी दिला आहे; तर प्रहार विद्यार्थी संघटनेचे कोकण विभागीय प्रमुख संतोष गवस यांनीही तावडे यांच्या या महाविद्यालय मान्यतेच्या घोटाळ्याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

Web Title: Danve of bogus colleges