पाळणाघरांमध्ये सीसीटीव्ही लावणे सक्तीचे 

CCTV
CCTV

मुंबई : नोकरदार महिलांसाठी सुरक्षित पाळणाघरेही आवश्‍यक असली तरी या पाळणाघरांवर राज्य सरकारचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

खारघर येथील 'पूर्वा डे केअर' पाळणाघरात लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारचे डोळे उघडले असून, सर्व पाळणाघरांमध्ये सीसीटीव्ही लावणे सक्‍तीचे केले जाणार आहे. 

मुंबई, पुण्याबरोबरच राज्यात इतर शहरांमध्येही पाळणाघरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे; मात्र त्याबाबतच्या कोणत्याही माहितीबाबत राज्य सरकार अनभिज्ञ आहे. पाळणाघराबाबत कोणतेही धोरण नसताना खारघर येथील घटनेनंतर महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व पाळणाघरांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे जाहीर केले आहे. तसेच खारघर येथील वादग्रस्त पाळणाघराची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून, आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. 

विधान परिषदेच्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी पाळणाघर चालवण्यासाठी राज्य सरकारचे कोणतेही धोरण किंवा नियमावली नसल्याकडे लक्ष वेधले असून, महापालिका, पोलिस यांच्या सहकार्याने पाळणाघरातील मालकांना आणि आयांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. 

शिवसेना, शेकापकडून पाळणाघराची मोडतोड 
'पूर्वा डे केअर' पाळणाघरात दहा महिन्यांच्या बालिकेला झालेल्या अमानुष मारहाणीचे तीव्र पडसाद आज उमटले. शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाळणाघराची तोडफोड करत घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. हे पाळणाघर प्रियंका निकम ही महिला चालवते. यामध्ये काम करणारी आया अफसाना शेख ही रुचिता आणि रजत सिन्हा यांच्या बालिकेला चेंडूसारखे इकडेतिकडे फेकत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

आंदोलनात शिवसेनेचे खारघर विभागप्रमुख गुरुनाथ पाटील, शेकापच्या खारघर महिला अध्यक्षा पूनम गायकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरपंच सिद्धी संजय घरत यांनी खारघर पोलिस ठाण्यात बालिका मारहाणप्रकरणी पत्र दिले आहे. त्यामध्ये आया आणि पाळणाघरच्या मालकीण प्रियंका निकम यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com