पीकविमा योजनेला 31जुलैपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

- शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन 

औरंगाबाद : शासनाने खरीप हंगाम 2019 मध्ये पंतप्रधान पीकविमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यासाठी एक नव्हे दोन वेळ मुदवाढ देण्यात आली आहे. विमा भरण्यासाठी अंतिम मुदत 24 जुलै होती ती वाढवून 29 जुलै आता ती पुन्हा वाढवून 31 जुलै बुधवारपर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

यामूळे ज्या शेतकऱ्यांना विमा भरणे बाकी आहे त्यांना संधी मिळणार आहे. या विषयी शासनाने सोमवारी (ता.29) परित्रकाद्वारे हे कळविले आहे. 
योजनेत सहभागी होण्यासाठी बॅंक व "आपले सरकार सेवा केंद्र' (डिजिटल सेवा केंद्र) यांच्यामार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत पीकविमा संरक्षण मिळण्यास्तव विहित मुदतीपूर्वी नजीकच्या बॅंक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्‍यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.

अधिक माहितीसाठी तत्काळ नजीकच्या कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजीकच्या बॅंक, "आपले सरकार सेवा केंद्र' (डिजिटल सेवा केंद्र) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

विमा योजनेत तांत्रिकदृष्ट्या चांगले बदल
या वर्षी केंद्र सरकारने पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये तांत्रिकदृष्ट्या खूप चांगले बदल केले आहेत ज्यामध्ये संबंधित शेतकऱ्यांला विमा कंपनीमार्फत एसएमएस पाठविला जातो ज्यामध्ये आपला हफ्ता त्यांना मिळाल्याची नोंद आहे तसेच त्या पावतीवर QR CODE देखील छापून येत आहे जो स्कॅन केला असता विम्याची संपूर्ण माहिती मोबाईलवर उपलब्ध होते.- शार्दूल देशपांडे माहिती अधिकार कार्यकर्ते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadline of crop insurance is increase due to July 31