सोनई हत्याकांडातील पोपट दरंदलेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

नाशिक : सोनई (जि. नगर) येथील तिहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले या कैद्याचा शनिवारी सकाळी साडेसहाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. 

नाशिक : सोनई (जि. नगर) येथील तिहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले या कैद्याचा शनिवारी सकाळी साडेसहाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. 

सोनई येथील गणेशवाडीत तिघांची हत्या झाली होती. त्यात पोपट ऊर्फ रघुनाथ विश्‍वनाथ दरंदले (वय 55) याला पाच जानेवारी 2013 ला अटक झाली. हा खटला नाशिकमध्ये चालला. त्यात नाशिकच्या सत्र न्यायालयाने 20 जानेवारी 2018 ला दरंदलेसह इतरांना फाशीची शिक्षा सुनावली. तेव्हापासून दरंदले नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात होता. काही दिवसांपासून तो आजारी होता. शिवाय मध्यंतरी त्याला पक्षघाताचा आजारही झाला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी त्याला हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. दरंदले हा फाशीची शिक्षा झालेला कैदी असल्याने कारागृह शासनाच्या नियमानुसार पोलिस महासंचालकांची परवानगी घेऊन जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा रुग्णालय व नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. 

घडलेली घटना अशी 
नेवासा फाटा (जि. नगर) परिसरातील त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या बी. एड. महाविद्यालयातील एका मुलीचे संस्थेत शिपाई असलेल्या सचिन सोहनलाल घारू (वय 23) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमाची कुणकुण मुलीच्या घरच्यांना समजताच प्रतिष्ठित असलेल्या या कुटुंबातील पोपट ऊर्फ रघुनाथ विश्‍वनाथ दरंदले यांनी सचिनची हत्या करण्याचा कट इतरांच्या साथीने रचला. त्यासाठी सेफ्टी टॅंक साफ करण्याच्या बहाण्याने सचिनला वस्तीवर बोलावण्यात आले. सचिन हा मित्र राहुल ऊर्फ तिलक राजू कंडारे (वय 26) आणि संदीप राजू थनवार (24) यांच्यासह वस्तीवर पोचल्यानंतर याठिकाणी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींनी संदीपला सेफ्टी टॅंकमध्ये बुडवून मारले. हे पाहताच पळून जात असलेल्या राहुलला कोयत्याने वार करून मारले. 

सचिन घारू याला वैरणीत टाकून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे विहीर, कूपनलिका व स्वच्छतागृहाच्या टाकीत फेकून दिले होते. यात सात जणांना अटक झाली. नगरऐवजी या हत्याकांडाची सुनावणी नाशिकमध्ये घेण्यात आली. ऍड. उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षातर्फे कामकाज पाहिले. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी याप्रकरणी सहा जणांना दोषी ठरवत त्या सर्वांना जानेवारी 2018 मध्ये मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. 

Web Title: Death of a Criminals in Sonai murder case