हेल्मेट नसल्याने घात! 

मंगेश सौंदाळकर
मंगळवार, 8 मे 2018

मुंबई - राज्यात गेल्या वर्षी तब्बल 4,114 दुचाकीस्वारांचा रस्त्यांवरील अपघातात मृत्यू झाला. यातील 75 टक्के चालकांनी हेल्मेट घातले नव्हते, असे राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालात नमूद केले आहे. 

मुंबई - राज्यात गेल्या वर्षी तब्बल 4,114 दुचाकीस्वारांचा रस्त्यांवरील अपघातात मृत्यू झाला. यातील 75 टक्के चालकांनी हेल्मेट घातले नव्हते, असे राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालात नमूद केले आहे. 

महामार्ग पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा शोध घेतला. महामार्गांवर रात्री वीज नसणे, चालकाचे नियंत्रण सुटणे, मद्यपान, रस्त्यावर पसरलेली खडी, रेती आणि तेलामुळेही अपघात होतात, असे अहवालात म्हटले आहे. रस्त्यावरील खोदकामही अनेक वेळा मृत्यूचे कारण ठरले आहे. राज्यात गतवर्षी सुमारे 35,853 अपघातांची नोंद झाली. त्यात 11,220 गंभीर अपघात होते. यात 12,664 जणांचा मृत्यू झाला असून, 32,128 जण जखमी झाले आहेत. यात सर्वाधिक 34 टक्के अपघात हे दुचाकीस्वारांचे होते. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी शहरात हेल्मेट सक्तीला दुचाकीस्वार प्रतिसाद देत असल्याचे दिसते. मात्र, ग्रामीण भागात फारसे हेल्मेट वापरले जात नाहीत. पोलिसांकडून कारवाई होऊ नये, याकरिता तात्पुरते हेल्मेट वापरले जाते. दुचाकीस्वारांच्या मृत्यूचा हा आकडा म्हणजे धोक्‍याची घंटा असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दुचाकीप्रमाणेच ट्रक, लॉरी, टॅंकर अपघातात 1,928 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. 

दुचाकी अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 75 टक्के मृत्यू हे हेल्मेट नसल्यामुळे झाले आहेत. त्यामुळे हेल्मेटबाबत प्रभावी जनजागृती होणे गरजेचे आहे. 
- विजय पाटील,  अधीक्षक, महामार्ग पोलिस (मुख्यालय) 

- 2017 - 90 सायकलस्वारांचा मृत्यू 
- 2018 - मार्चपर्यंत 3,055 गंभीर अपघात 

वर्ष आणि अपघात (मार्चअखेर) 
2015 - 63,805 
2016 - 39,878 
2017 - 35,853 
2018 - 9,243 
(गृह विभागाची आकडेवारी) 

Web Title: Death due to no helmet