कर्जमाफीचा मानकरी पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

मुंडेंचा हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफी प्रमाणपत्रानंतरही डोक्‍यावर कर्ज असलेल्या अशोक मनवर यांच्या कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत सभागृहात सादर करून मुंडे यांनी सरकारच्या कर्जमाफी योजनेचे वाभाडे काढले. कर्जमाफी होऊन दोन वर्षे झाली, तरी शेतकऱ्यांची कर्जे माफ झालेली नाहीत. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारकडून खोटी आकडेफेक केली जात असून, त्याचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही. सरकारच्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही असे मुंडे यांनी सांगितले.

कर्जमाफीचा पहिला मानकरी म्हणून ज्या शेतकऱ्याचा सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव केला, त्याच अशोक मनवर यांना आज मंत्रालयात पोलिसांनी अटक केल्याने याचे तीव्र पडसाद विधिमंडळत उमटले.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही याची गंभीर दखल घेतली. अशोक मनवर हे वाशीम जिल्ह्यातील जामरूण जहाँगीर गावचे  शेतकरी आहेत. त्यांना राज्यातील शेतकरी कर्जमाफीमध्ये पहिली कर्जमाफी झाली होती. रीतसर अर्ज करून संगणकीकृतरीत्या त्यांना सरकारने कर्जमाफी दिली होती. त्यासाठी त्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्रदेखील देण्यात आले होते.

मात्र, दोन वर्षे लोटली तरी केवळ हातात प्रमाणपत्रच असून, कर्जाची रक्‍कम मात्र खात्यावर जशीच्या तशी असल्याने तो फिर्याद मांडण्यासाठी ते मंत्रालयात आले होते. मात्र, मंत्रालय पोलिसांनी त्यांना अटक केली. तारांकित प्रश्नांच्या चर्चेत सहभागी होताना धनंजय मुंडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडली.

निलंबनाचे सभापतींचे निर्देश
कर्जमाफी आणि अन्य विविध मागण्यांसाठी विधिमंडळात आलेल्या नामदेव पतंगे आणि अशोक मनवर या शेतकऱ्यांना बेकायदेशीररीत्या अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सरकारला विधान परिषदेत दिले. राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेत मराठवाड्यातील नामदेव पतंगे आणि अशोक मनवर या शेतकऱ्यांचा समावेश होता. मध्यंतरी पतंगे यांनी शेतीसाठी किडनी विकण्याची परवानगी सरकारकडे मागितली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt waiver Ashok manvar Arrested Crime