नाट्य संमेलन बारामतीला हा निर्णय एकमतानेच! - प्रसाद कांबळी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 March 2020

कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी बैठक बोलावली होती. त्यात बारामतीच्या नावावर एकमत झाले होते. सर्व शाखा या एका विचाराच्या आहेत, त्यामुळे पुण्याला वगळले आणि बारामतीला झुकते माप असा वाद कुणीही निर्माण करू नये.
- किरण गुजर, अध्यक्ष, बारामती शाखा

पुणे - बारामतीला नाट्य संमेलन व्हावे, असा निर्णय एकमताने झाला होता. नाट्य परिषदेच्या पुणे विभागातील सहा शाखांनी त्यास संमती दर्शविल्यानेच या संमेलनासाठी बारामती हे स्थळ ठरले. यात मध्यवर्ती शाखेने कोणताही हस्तक्षेप केला नव्हता, त्यामुळे पुण्याला डावलल्याच्या बातम्या आणि वाद अनाठायी असल्याचे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी स्पष्ट केले.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शंभराव्या नाट्य संमेलनासाठी पुण्याला वगळून बारामतीला झुकते माप दिल्याचे वृत्त समाज माध्यमातून फिरत आहे. याबाबत कांबळी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘कुणीतरी चुकीच्या बातम्या माध्यमातून पेरत आहे. राज्यात हे संमेलन करण्याचा निर्णय झाल्यानंतर पुणे विभागात संमेलन कुठे घ्यावे, हे त्या विभागातील शाखांनी ठरवायचे होते. या शाखांनी बारामती हे स्थळ निश्‍चित केले होते. नंतर मध्यवर्ती शाखेने त्यावर शिक्कामोर्तब केले होते. आम्ही त्यात कोणताही हस्तक्षेप केला नव्हता.’’

महाजन म्हणाले, ‘‘पुण्यात शंभरावे नाट्य संमेलन व्हावे, अशी मागणी आम्ही केली होती; परंतु राज्यात संमेलन घेण्याचा निर्णय झाला, त्या वेळी बारामती शाखेने पसंती दर्शविल्याने तिथे संमेलन घेण्याचे ठरले होते. नाट्यजागर हा पुण्यापेक्षाही ग्रामीण भागात करावा, हेही आम्ही म्हटले होते. बारामतीला संमेलन करण्यास कुणाचाही विरोध नव्हता. संमेलनासाठी पुण्याला डावलले अशीही कुणाची भावना नाही. माध्यमातून हा रंग का दिला जात आहे, हे कळत नाही.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The decision on natya sammelan was taken unanimously for Baramati prasad kambli