उसाच्या एकरी उत्पादनात घट

उसाच्या एकरी उत्पादनात घट

भवानीनगर - पुणे जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू होताच पावसाने फिरवलेली पाठ व दुष्काळी स्थिती यामुळे एकरी सरासरी पाच टनांचा फटका ऊस उत्पादकांना बसल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यात आजमितीस असलेल्या २ लाख ७३ हजार एकर उसाचा विचार करता शेतकऱ्यांना या दुष्काळाचा एकरी अंदाजे १२ हजार ५०० रुपयांप्रमाणे ३४१ कोटींचा फटका बसेल, असे प्राथमिक चित्र आहे.

मोसमी पावसाने यंदा पुणे जिल्ह्याला दगा दिला. धरणे भरल्याने व पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस चांगला झाल्याने सरासरी वाढलेली दिसत असली, तरी इंदापूर, बारामती, पुरंदर, दौंड, शिरूर या तालुक्‍यांमध्ये पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे पाण्याअभावी उसाच्या फायबरमध्ये वाढ झाली असून, बाहेरून मोठ्या दिसणाऱ्या उसाचे प्रत्यक्षात अपेक्षित वजन भरत नाही, हे सध्याचे चित्र आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा लाख टन उसाचे गाळप झाले आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत एकरी ५ ते ६ टनांचा फटका या वर्षी ऊस उत्पादनात बसत असल्याचे कारखान्यांचे शेतकी अधिकारी सांगत आहेत. छत्रपती कारखान्याचे शेतकी अधिकारी अनिल राऊत यांनी तोडणी करताना उसाचे उत्पादन घटल्याचे स्पष्ट करीत हे प्रमाण एकरी ५ ते ६ टनांपर्यंत असल्याचे मत व्यक्त केले. दुसरीकडे माजी आमदार ॲड. अशोक पवार यांनीही उसाचे एकरी उत्पादन पावसाअभावी घटल्याचे निरीक्षण नोंदवले. एकूणच जिल्ह्यात उसाला फटका बसला असून, सरासरी २५०० रुपये प्रतिटन एफआरपी गृहीत धरली, तर हा फटका एक एकर उसासाठी साधारणतः १२ हजार ५०० रुपयांचा आहे. त्यामुळे अगोदरच दुष्काळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा दुहेरी व मोठा आर्थिक फटका बसणार आहे. जिल्ह्यातील तोडणीसाठी येणाऱ्या पावणेतीन लाख एकरांचा विचार करता हा आकडा तब्बल ३४१ कोटींवर पोचणार आहे.

हुमणी खोडवा संपविणार...
या वर्षी उसाचे उत्पादन कागदावर दिसत असले, तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. त्याला पाऊस व हुमणी ही दोन कारणे ठरणार आहेत. सध्या जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणच्या खोडव्याच्या पिकांना हुमणीने विळखा घातला असून, त्यामुळे शेतकरी हैराण आहेत. छत्रपती कारखान्याच्या शेतकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास पाच हजार एकर क्षेत्रात हुमणीने खोडव्यामध्ये प्रादुर्भाव केला असून ५ टक्‍क्‍यांपासून ५० टक्‍क्‍यांपर्यंत उसाचे हुमणीने नुकसान केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com