'आयटीआय'कडे विद्यार्थ्यांचा कल घटला 

तेजस वाघमारे
शनिवार, 29 जून 2019

राज्यातील सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांकडील विद्यार्थ्यांचा ओघ कमी झाला आहे.

मुंबई : राज्यातील सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांकडील विद्यार्थ्यांचा ओघ कमी झाला आहे. "आयटीआय'मधील एक लाख 37 हजार 300 जागांसाठी शनिवारपर्यंत एक लाख 88 हजार 776 अर्ज आले आहेत. "आयटीआय'मधील प्रवेशासाठी अर्जनोंदणी तीन जूनपासून सुरू झाली. अर्ज करण्याची मुदत 30 जूनला संपणार असून, अर्जनिश्‍चिती एक जुलैपर्यंत करता येणार आहे.

'आयटीआय'मधील प्रवेशासाठी आतापर्यंत तीन लाख 59 हजार 708 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी दोन लाख 23 हजार 114 विद्यार्थ्यांनी अर्ज निश्‍चित केले आहेत. अन्य एक लाख 88 हजार 776 विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांचे पर्याय देऊन प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. 

राज्यभरात 417 सरकारी आणि 538 खासगी "आयटीआय' आहेत. सरकारी "आयटीआय'मध्ये 89 हजार 616 जागा आणि खासगी "आयटीआय'मध्ये 47 हजार 684 जागा आहेत. मागील वर्षी "आयटीआय'मधील प्रवेशासाठी चार लाख 14 हजार 705 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

यंदा नोंदणीत घट झाली आहे. अर्जनिश्‍चिती करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षी दोन लाख 90 हजार 413 होती. यंदा दोन लाख 23 हजार 114 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे सांगण्यात आले. अर्ज निश्‍चित करण्यासाठी आणखी मुदत असल्याने संख्येत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

महत्त्वाचे अभ्यासक्रम व जागा 

इलेक्‍ट्रिशियन : 20,440 
फिटर : 19,160 
वेल्डर : 17,660 
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट : 9,300 
डिझेल मेकॅनिक : 6,550 
मोटर मेकॅनिक : 5,040 
ड्रेसमेकिंग : 4,860 
इलेक्‍ट्रॉनिक मेकॅनिक : 4,101 
टर्नर : 2,820 
प्लंबर : 2,640.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decreased the Number of Students in ITI