सुरुंग पेरले जातायत दोन्हीकडून...

दीपा कदम
सोमवार, 8 एप्रिल 2019

अाल्लापल्लीपासून २५ किमी अंतरावर कासंमपल्लीपासून १० किमी अंतरावर लालीबाईचं येडंमपल्ली गाव आहे. कामाच्या वेळेत लोक भेटायला आली म्हणून चिडचिड करणाऱ्या लालीबाईला मुलाविषयी विचारल्यावर ती कावरीबावरी झाली. आमच्याशी बोलावे, असा विश्‍वास वाटल्यानंतर भडाभडा बोलू लागली,

सुरुंग त्यांचे...
मोह गोळा करायला जंगलात गेलेली लालीबाई हातातलं काम अर्धवट टाकून यावं लागलं म्हणून वैतागली होती. कोणाचा एवढा जीव चालला होता म्हणून मला बोलावलं...वेळ निघून गेली, तर मोह गोळा करून देणारात काय? अंगणाच्या दारात ठेवलेलं पाणी हातानेच पायावर घेत लालीबाईच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. माडिया भाषेतले तिचे शब्द नंतर सोबतच्या शिक्षिकेने सांगितले. पण, तिच्या बोलण्याच्या आवेशावरून ती वैतागल्याचं स्पष्ट दिसत होतं. सकाळच्या वेळेत मोहफुलं गोळा करण्यापेक्षा कोणतंच महत्त्वाचं काम उन्हाळच्या दिवसांत आदिवासींना नसतं. शिवाय लालीबाईचा मुलगा पोलिसात नोकरी करीत असूनही तिला पोटासाठी मोह वेचण्याशिवाय पर्याय नाही. कारण तिचा मुलगा कमवत असलेला पैसा तिच्या कुटुंबाच्या उपयोगी येऊ शकत नाही. मुलाचा पैसा घेणे तर दूरच, पण त्याला भेटले तरीही तिच्यासाठी तो मोठा गुन्हा ठरू शकतो नक्षलवाद्यांसमोर...

अाल्लापल्लीपासून २५ किमी अंतरावर कासंमपल्लीपासून १० किमी अंतरावर लालीबाईचं येडंमपल्ली गाव आहे. कामाच्या वेळेत लोक भेटायला आली म्हणून चिडचिड करणाऱ्या लालीबाईला मुलाविषयी विचारल्यावर ती कावरीबावरी झाली. आमच्याशी बोलावे, असा विश्‍वास वाटल्यानंतर भडाभडा बोलू लागली, पोलिसात भरती होऊ नको म्हणून ज्योतिरामला सांगितलं होतं, पण तो ऐकला नाही. गावापासून तुटला आणि आमच्यापासून. त्याच्याशी कधी बोलणं होत नाही की तो नजरेला पडत नाही. सुरवातीला कडक, फटकळ वाटणारी लालीबाई मुलाच्या आठवणीने हळवी झालीं.

सुरुंग आपले... 
२१ एप्रिलला एक वर्ष पूर्ण होईल. गड्‌डेपल्ली गावातून लग्नासाठी गेलेल्या त्या आठ मुलांची गावाने अद्याप तेरवी केलेली नाही. गेले वर्षभर हे गाव सुतकात आहे. कस्नासूरला पोलिसांनी केलेल्या नक्षलविरोधी कारवाईत ही आठ मुलं मारली गेल्याचा संशय आहे. मात्र, गावकऱ्यांनी आग्रह केल्यानंतरही पोलिसांनी या मुलांची ओळख पटविण्यासाठी या मुलांचे चेहरे त्यांना दाखवले नाहीत. गडचिरोलीतील भामरागड येथे कस्नासूर या गावात राज्य पोलिस दलाच्या नक्षलविरोधी पथकाने २१ एप्रिलला केलेल्या कारवाईत ३७ नक्षलवादी मारले गेले. यामध्ये गड्डेपल्लीतील आठ मुलांचा समावेश होता. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाकडे आलेली मुलं गावातल्या मोठ्या मुलांसोबत शेजारच्याच कस्नासूर गावात लग्नासाठी गेली होती. पिरिमिली तालुक्‍यातील दलम कमांडर साईनाथ हाही गड्डेपल्ली गावातलाच. तो पोलिसांच्या कारवाईत मारला गेल्याची माहिती देण्यासाठी गावात एक पोलिस कॉन्स्टेबल आला. त्यानेच भरपूर नक्षलवादी मारले गेले असल्याचे सांगितले. गावातली मुलं तीन दिवस परत आली नव्हती. 

कुठून तरी बहिणीची माहिती मिळेल म्हणून मधुकर गावाबाहेरचे कोणी आले, तर रासोचा फोटो असलेले आधारकार्ड घेऊनच येतो. आम्हाला  बहिणीचे आधारकार्ड दाखवत मधुकरने सांगितले, माझी बहीण रासो. लग्नासाठी गेली ती परत आलीच नाही. गावातल्या तीन मुली आणि पाच मुलगे लग्नासाठी गेले होते. नक्षलवादी कारवायांमध्ये या मुलांचा काहीच सहभाग कधीच नव्हता. पण, त्यात ती मारली गेली असावीत, असा संशय आहे. मारले गेलेल्या मुलांचे मृतदेह दाखवले असते, तर मुलं जिवंत की मेलीत, त्याची तर खात्री पटली असती. माझे आई-वडील दोघेही तेव्हापासून पागल झालेत. त्यांची समजूत कशी घालणार? गोंड भाषेत मधुकर सांगत होता. 

विजय मडावीचा छोटा भाऊ मंगेशदेखील आठ मुलांमध्ये होता. विजय सांगतो, आदिवासी समाजात जोपर्यंत तेरवी केली जात नाही, तोपर्यंत सुतक सरत नाही. मंगेशचा सहभाग कशातच नव्हता. मानवी हक्‍क आयोगापासून आम्ही सगळीकडे तक्रार केली आहे. पण, आम्हाला कुठेच न्याय मिळालेला नाही.

गडचिरोलीतील आदिवासी गावांमधील मूलभूत सुविधांच्या प्रश्‍नांपर्यंत पोहोचताच येत नाही, इतक्‍या मोठ्या प्रमाणात नक्षलवादाची पाळंमुळं घट्‌ट रोवलीत. या मुळांपासून सुटका करून घेण्यासाठी ज्योतिरामसारखे तरुण झगडतायत, त्यांना शहराकडे धाव घ्यावी लागतेय. ज्योतिरामसारख्यांची सुटका तर होते, पण मागे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाचं काय...गड्‌डेपल्लीत आणि त्याच्या आजूबाजूच्या गावात नक्षलवादी कारवाईत मारल्या गेलेल्या आठ मुलांशिवाय अनेक मुलं आहेत, जी आज भीतीच्या छायेखाली आहेत. त्यांना यंत्रणेवरचा राग काढावसा नाही वाटणार? त्यामुळेच सुरुंग पेरले जातायत त्यांच्याकडूनही आणि आपल्याकडूनही.

Web Title: Deepa kadam article landmines dares people in Gadchiroli