भाजपला सत्तेचा माज आलाय : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

कोल्हापूर आणि सांगलीतील पूर परस्थितीकडे पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे : महापुरासारखी परिस्थिती राज्यात निर्माण झाली असताना हे सरकार दुर्लक्ष करतं आहे. राजकारण एके राजकारण करत बसायचं हेच या सरकारचं काम आहे. सरकारला सत्तेचा माज आला आहे. जी भीषण स्थिती आहे त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केली आहे.

कोल्हापूर आणि सांगलीतील पूर परस्थितीकडे पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

पक्षप्रवेश, यात्रा यामध्ये सत्ताधारी मग्न आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही. आम्ही अन्नाची पाकिटं वाटत असताना त्यावर मनसेची  लेबलं लावली नाहीत, असाही टोला राज ठाकरेंनी  लगावला. निवडणुकीत 220 जागा येतील असं तुम्ही छातीठोकपणे सांगता, मग एवढा पाऊस पडल्यावर काय परिस्थिती निर्माण होईल? याचा अंदाज तुम्हाला येत नाही का? असाही प्रश्न राज यांनी यावेळी उपस्थित केला. पक्ष आणि मतभेद सगळं बाजूला ठेवून जे पूरग्रस्त आहेत, त्यांना मदत केली गेली पाहिजे. नैसर्गिक संकट येतं तेव्हा अशाच धोरणाचा अवलंब करायचा असतो. मात्र या सरकारला निवडणूक आणि सत्ता उपभोगणं याशिवाय काहीही दिसत नाही.

तुम्ही लोकांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी जाणार नसाल, तर मग मते मागायला कोणते तोंड घेऊन जाणार आहात? असा सवाल राज यांनी विचारला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delayed Assembly elections says Raj Thackeray