
Arvind Kejriwal : विरोधी सरकार आलंच तर 'या' तीन प्रकारे त्रास दिला जातो; पवारांच्या भेटीनंतर केजरीवाल म्हणाले...
मुंबईः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
दिल्लीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या 'ट्रान्स्फर पोस्टिंग'चं प्रकरण गाजत आहे. केंद्र सरकार 'राष्ट्रीय राजधानी सिव्हिल सेवा प्राधिकरण' हा अध्यादेश घेऊन येत आहे. संसदेत हा कायदा सहा महिन्यात पास करणं आवश्यक आहे. जर सहा महिन्यात या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर झालं नाही तर अध्यादेश रद्द होईल. दिल्लीच्या उपराज्यपाल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केजरीवाल सरकारच्या बाजूने निर्णय दिला होता.
राज्यसभेत कुणाचंही स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे हे विधेयक भाजपला मंजूर करणं अवघड आहे. विरोधकांच्या एकजुटीसाठी अरविंद केजरीवाल देशातील विरोधकांच्या भेटी घेत आहेत. यावेळी बोलतांना केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पक्षाचं सरकार आल्यापासून दिल्लीतील लोकांवर अन्याय होत आहे. आप सरकारला काम करु दिलं जात नाही. ही लढाई दिल्लीची नसून संपूर्ण देशाची आहे.
केजरीवाल पुढे म्हणाले की, जिथं भाजपचं सरकार येत नाही तिथे मात्र भाजप आमदारांना फोडून, ईडी-सीबीआय पाठवून किंवा अध्यादेश आणून सरकारला त्रास दिला जातो. मात्र आता केंद्राने आणलेल्या अध्यादेशाला सर्व विरोधकांनी कडाडून विरोध केला पाहिजे. शरद पवार यांनी केंद्राच्या अध्यादेशाला विरोध करण्याची भूमिका घेतल्याने त्यांचं आभार मानतो, अशा शब्दांमध्ये केजरीवाल यांनी भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, शरद पवार यांनी आम आदमी पक्षाला समर्थन दिलं असून केंद्र सरकारच्या संभाव्य अध्यादेशाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. देशातील लोकशाहीवर आघात सुरु असून ती टिकण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.