शेतकऱ्यांना ताबडतोब भरपाई द्या!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

राज्यभरात परतीच्या पावसाने शेतीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यादेखत वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मुंबई : राज्यभरात परतीच्या पावसाने शेतीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यादेखत वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांवरील या आपत्तीच्या काळात शासन व प्रशासनाने अत्यंत संवेदनशीलपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची आवश्यकता आहे. नुकसानीचे पंचनामे तबडतोब करून शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे.

दरम्यान, पावसामुळे भाताच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. मका, बाजरी, ज्वारी पिकांच्या कणसात पाणी शिरल्याने कणसे खराब झाली आहेत. दाण्यांना पाणी लागल्याने कणसांना कोंब आले आहेत. सोयाबीन, भुईमुग, तुरीच्या शेंगा सडल्या आहेत. बोंडामध्ये पाणी शिरल्याने कापूस भिजून गेला आहे. सरकीला मोड आले आहेत.

शेतातील लाल कांदा वाफ्यांमध्ये सडू लागला आहे. रांगड्या कांद्याची रोपे कुजली आहेत. द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. झेंडू, शेवंती, गुलाब या फूल पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अटी शर्ती व निकषांचा घोळ न घालता शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत करण्याची आवश्यकता आहे.

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित प्रत्येक शेतकऱ्याला मदत पोहोचावी यासाठी राज्य सरकारने अत्यंत तातडीने व संवेदनशीलपणे कामाला लागण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय आपत्ती साहय्यता निधी अंतर्गत राज्याला भरीव मदत मिळावी यासाठी निकराचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सत्तेची समीकरणे जुळविण्यात मश्गुल असलेले राज्यकर्ते मात्र याबाबत गांभीर्याने पावले उचलताना अजिबात दिसत नाहीत ही अत्यंत खेदाची आणि संतप्त करणारी बाब आहे. 

दरम्यान, शेतकऱ्यांना पीक विमा योजने अंतर्गत नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे विहित नमुन्यात क्लेम करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना असे क्लेम करता यावेत यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
आपत्तीच्या या काळात निकष आणि अटी शर्तींचा घोळ न घालता शेतकऱ्यांना केंद्राची भरीव मदत मिळेल यासाठी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा व राज्याच्या वतीनेही भरीव मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात डॉ अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ. अजित नवले आदींनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for All India Kisan Sabha to pay compensation