सोलापूरच्या कोरोना टास्क फोर्सवर यांच्या नियुक्तीची मागणी 

प्रमोद बोडके
Wednesday, 8 July 2020

तीन दशकांपासून वैद्यकीय सेवेत

मार्कंडेय रुग्णालयात संचालक व माजी चेअरमन डॉ. विजयकुमार आरकाल, विद्यमान चेअरमन डॉ. माणिक गुर्रम गत दोन महिन्यांपासून कोविडविषयक काम करीत आहेत. यामध्ये रुग्णालयात आतापर्यंत 300 कोविड रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यामध्ये 175 जण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले. सध्या 88 कोविड रुग्णांवर उपचार घेत असून त्यामध्ये महात्मा फुले योजनेंतर्गत 57 जण उपचार घेत आहेत. या रुग्णालयाचे कोविडविषयक कार्य चांगले असल्याने या रुग्णालयाचे डॉ. विजयकुमार आरकाल, डॉ. माणिक गुर्रम हे दोघेही तीन दशकांपासून वैद्यकीय सेवेत आहेत. 

सोलापूर : कोरोना आपत्तींबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याची नुकतीच बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. महाराष्ट्रातील कोविड रुग्णांची संख्या ही देशाच्या एकूण संख्येच्या निम्मी आहे. याची गांभीर्याने नोंद घेऊन जिल्हास्तरीय कोविड टास्क फोर्स नेमण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

त्यानुसार येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्सची नियुक्ती शासनाकडून करण्यात येणार आहे. या टास्क फोर्सवर सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे संचालक व माजी चेअरमन डॉ. विजयकुमार आरकाल, विद्यमान चेअरमन डॉ. माणिक गुर्रम यांची टास्क फोर्सवर नियुक्ती करावी अशी मागणी मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे संचालक प्रशांत पल्ली यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली आहे. 

सोलापूरच्या आमदार या नात्याने आपण महाराष्ट्र शासनाकडे ही शिफारस करण्याची विनंती पल्ली यांनी केली आहे. 225 बेडची क्षमता या रुग्णालयाची आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कोविड रुग्णांवर मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचार होत आहे. तेव्हा या रुग्णालयाचे कोविडविषयक योगदान व डॉ. विजयकुमार आरकाल, डॉ. माणिक गुर्रम यांचा अनुभव पाहता या तज्ञ डॉक्‍टरांची टास्क फोर्सवर नियुक्ती करणे गरजेचे आहे. याचा फायदा जिल्ह्याला होणार असल्याचा विश्‍वास संचालक पल्ली यांनी व्यक्त केला आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन पाठवण्यात आल्याचेही पल्ली यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for appointment of Corona Task Force of Solapur