डेंगीच्या रुग्णांची संख्या घटली - सावंत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - पावसाळ्यात उद्‌भविणाऱ्या साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. या वेळी स्वाइन फ्लू, मलेरिया, डेंगी, लेप्टोस्पायरोसिस यासंदर्भात उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मुंबईत डेंगीच्या रुग्णांची संख्या 50 टक्‍क्‍यांनी कमी असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

गेल्या वर्षी राज्यातील 14 जिल्ह्यांत 398 जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाली होती. मात्र गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक मोहिमेमुळे आणि रुग्णांना देण्यात आलेल्या डॉक्‍सिसायक्‍लीन औषधामुळे लेप्टोस्पायरोसिस आटोक्‍यात आला; शिवाय मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. यंदा मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील 19 रुग्णांना लागण झाली आहे. मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

राज्यात या वर्षी जानेवारी ते जूनदरम्यान सुमारे आठ लाख रुग्णांची स्वाइन फ्लू तपासणी करण्यात आली आहे. त्यातील बाधित रुग्णांची संख्या 34 आहे. सुमारे 9,000 संशयित रुग्णांनी ऑसेलटॅमीवीर गोळ्या देण्यात आल्या आहेत. यंदा मुंबईत 43 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, सध्या मुंबईत स्वाइन फ्लूचा रुग्ण नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

राज्यातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, नांदेड, ठाणे, सोलापूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असून, त्याच्या प्रभावी उपाययोजनेसाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये जुलैपासून हत्तीरोग रात्र चिकित्सा केंद्र सुरू करण्याचे निर्देश या वेळी आरोग्यमंत्र्यांनी दिले.

या वेळी पुणे, नाशिक, पिंपरी- चिंचवड या महापालिका क्षेत्रातील स्वाइन फ्लू, डेंगी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला. बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त डॉ. संजीवकुमार, साथरोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: dengue patient deepak sawant