'राज्याचा विकास दर शहर विकासावर अवलंबून '

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मुंबई - राज्याचा विकास दर हा शहरांच्या विकासावर अवलंबून असल्याने तो अधिकाधिक वाढण्यासाठी नागरिकांना चांगले राहणीमान व गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी स्वच्छ शहरांची निर्मिती होणे आवश्‍यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न करू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. अमृत व नगरोत्थान अभियानातंर्गत राज्यातील 28 शहरांमध्ये 1 हजार 622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपुजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थानी झाला, त्या वेळी ते बोलत होते. 

मुंबई - राज्याचा विकास दर हा शहरांच्या विकासावर अवलंबून असल्याने तो अधिकाधिक वाढण्यासाठी नागरिकांना चांगले राहणीमान व गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी स्वच्छ शहरांची निर्मिती होणे आवश्‍यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न करू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. अमृत व नगरोत्थान अभियानातंर्गत राज्यातील 28 शहरांमध्ये 1 हजार 622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपुजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थानी झाला, त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी फडणवीस म्हणाले, की उंच इमारती, सुंदर रस्ते व बगीचे तयार केले म्हणजे शहरांचा विकास झाला, असे मानणे पूर्णत: योग्य ठरत नाही, तर शहरांमधील नागरिकांना शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, मलनिस्सारणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर करून शहरांमध्ये हरितपट्टे तयार केल्यास शहरांचा विकास होईल. शहरांच्या विकासावरच राज्याचा विकास दर अवलंबून असल्याने शहरांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होत आहेत. वाढते नागरीकरण ही समस्या न मानता संधी मानून शहरांचा विकासास प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी राज्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा पुरेपूर वापर करून शहरांचा विकास साधण्यात येत आहे. या विकासाच्या माध्यमातून शहरांमध्ये रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना त्यांच्या कामासाठी कार्यालयात जाण्याची गरज भासू नये यासाठी नागरी भागातील सर्व सेवा ऑनलाइन देण्यासाठी ई-पोर्टल तयार करण्यात येत आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना त्यांना आवश्‍यक असलेल्या सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार आहे, तसेच नगरपालिकांनी नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या. दरम्यान, एकाच वेळी राज्यातील 28 शहरांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून 1 हजार 266 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे ई-भूमिपूजनाचा उपक्रम राज्यात प्रथमच होत आहे. नगरविकास विभागाचा हा अतिशय अभिनव उपक्रम असल्याचे गौरवोद्‌गार विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांशी फेसटाइमच्या माध्यमातून संवाद साधताना काढले. 

स्वच्छ व स्मार्ट शहरांत महाराष्ट्र आघाडीवर 
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 100 शहरे संपूर्ण हागणदारीमुक्त झाली आहे. येत्या ऑक्‍टोबरपर्यंत राज्यातील संपूर्ण शहरे हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. देशातील स्वच्छ शहरांमध्ये सर्वाधिक स्वच्छ शहरे महाराष्ट्रातील आहेत. त्याचबरोबर, सर्वाधिक 7 स्मार्ट शहरे असणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, तर अमृत अभियानात राज्यातील 44 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील नागरी भागात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू आहेत. या विकासकार्यात सर्वांनी सहभाग द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी उपस्थितांशी वेब कास्टद्वारे संवाद साधताना केले. 

Web Title: Depending on the rate of growth in the state of development of the city