प्लॅस्टिक पिशवीतून अनामत आणल्याने पाच हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नेवासे : नेवासे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीअर्ज भरताना अनामत रक्कम प्लॅस्टिक पिशवीतून आणल्याबद्दल आज दुपारी एका अपक्ष उमेदवाराला पाच हजार रुपये दंड भरावा लागला. मच्छिंद्र देवराम मुंगसे (रा. देडगाव, ता. नेवासे), असे या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे.

नेवासे : नेवासे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीअर्ज भरताना अनामत रक्कम प्लॅस्टिक पिशवीतून आणल्याबद्दल आज दुपारी एका अपक्ष उमेदवाराला पाच हजार रुपये दंड भरावा लागला. मच्छिंद्र देवराम मुंगसे (रा. देडगाव, ता. नेवासे), असे या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे.

मुंगसे आज दुपारी नेवासे विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारीअर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयात आले होते. निवडणूक अधिकाऱ्यांकडे अनामत रक्कम म्हणून त्यांनी दहा हजार रुपयांची चिल्लर (सुटे पैसे) आणली होती. त्या वेळी अधिकाऱ्यांनी "नियमानुसार फक्त एक हजार रुपयांपर्यंतचीच चिल्लर स्वीकारली जाईल,' असे सांगितले. त्यावर मुंगसे यांनी सुटे पैसेच घेण्याचा आग्रह धरीत वाद घालण्यास सुरवात केली. 

दरम्यान, सहायक निवडणूक अधिकारी, तथा नेवासे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी समीर शेख तेथे आले. मुंगसे यांनी 10 हजार रुपयांची चिल्लर ठेवलेली प्लॅस्टिकची पिशवी त्यांच्यासमोर ठेवली. बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल शेख यांनी लगेच मुंगसे यांना पाच हजार रुपये दंड केला. मुंगसे यांनी प्रथम पाच हजार रुपये दंड भरला. त्यानंतर सुट्या पैशांचा नाद सोडून उमेदवारी अर्ज व अनामत रक्कम भरली. या कारवाईची चर्चा झाल्यावर तहसील आवारातील अनेकांनी प्लॅस्टिक पिशव्या गायब केल्याचे चित्र दिसले.

तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी एकेक रुपया जमा करून आपल्याला ही रक्कम निवडणूक निधी म्हणून दिली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी ती स्वीकारायला हवी होती. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे.
- मच्छिंद्र मुंगसे, अपक्ष उमेदवार, नेवासे

नाणे कायदा 2011च्या कलम 6 (एक)नुसार, नाण्यांच्या स्वरूपातील रक्कम केवळ एक हजार रुपयांपर्यंत कायदेशीरदृष्ट्या चलन म्हणून स्वीकारता येते. राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. त्यामुळे प्लॅस्टिक पिशवीच्या पहिल्यांदा वापराबाबत पाच हजार, दुसऱ्यांदा सापडल्यास 10 हजार व तिसऱ्यांदा सापडल्यास 25 हजार रुपये दंड अधिक तीन महिने कारावासाची तरतूद आहे.
- शाहूराव मोरे, निवडणूक अधिकारी, नेवासे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deposit from plastic bag Bring a fine of five thousand

टॅग्स