
Devendra Fadnavis News: अजित पवारांनी खरडपट्टी काढल्यावर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी, म्हणाले...
Devendra Fadnavis News: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे मात्र आज विरोधी पक्षातील आमदारांच्या काही लक्ष वेधी लावण्यात आल्या होत्या मात्र विधानसभेत सरकारमधील सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ अध्यक्षांवर आली आहे. त्यामुळे आमदारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
मंत्र्याच्या या गैरकृत्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील संताप व्यक्त केला. अध्यक्ष महोदय, यांना जनाची नाही, मनाची तरी काही आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला होता. अजित पवारांच्या संतापानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, आम्ही गैरहजर मंत्र्यांना समज देऊ. 'अजित पवारांनी उपस्थित केलेली बाब अतिशय गंभीर आहे. आज जे घडलं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ऑर्डर ऑफ द डे रात्री १ वाजता निघाला. त्यानंतर मंत्र्यांना ब्रिफिंग घ्यावं लागतं.
अशावेळी सकाळी ९.३० ला लक्षवेधी लागली, तर मंत्र्यांना ब्रिफिंगला वेळच मिळत नाही. आम्ही मंत्र्यांना समज देऊ. त्यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे'. अशी उत्तर पवारांच्या नाराजीवर फडणवीसांनी दिले.
काय म्हणाले अजित पवार?
मी उपमुख्यमंत्री असताना सकाळ ९ वाजता कामकाज असेल तर तेव्हाही येऊन बसायचो. आज सकाळी ९.३० ला कामकाज सुरू झालं. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना जास्त व्याप असतो याची जाणीव आहे. पण संसदीय कामकाज मंत्र्यांनी तरी सकाळी लवकर येऊन बसायला हवं.
चंद्रकांत पाटलांवर माझा वैयक्तिक राग नाही. पण सभागृहात बसा ना येऊन जरा. सकाळी कामकाज चालू असताना ६ मंत्री गैरहजर होते. यांना जनाची नाही, मनाची काही आहे की नाही? असा संतप्त सवाल उपस्थित केला.
चंद्रकांत पाटील रात्री २-२.३० वाजेपर्यंत जागत नाहीत. त्यांना लवकर येऊन बसायला काय हरकत आहे? संसदीय कामकाज मंत्र्यांना जर जमत नसेल, तर त्यांनी थांबायला हवं. मंत्री सभागृहात नसल्यामुळे ७ वक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली.
हे अतिशय गलिच्छ कामकाज चाललं आहे. यांना कुणालाही विधिमंडळाच्या कामकाजात रस नाही. यांना बाकीच्याच कामात रस आहे. निर्लज्जपणाचा कळस झाल्याचं कामकाज चाललं आहे. अशा शब्दात अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.