इच्छा असूनही महसूलमंत्री बोललेच नाहीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

महसूलमंत्र्यांचा शब्द खरा ठरला
सात-आठ महिन्यांपूर्वी महसूलमंत्री पाटील हे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. त्या वेळी स्वामींच्या मंदिरात त्यांनी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टीच होणार असे सांगितले होते. स्वामी समर्थ माझा शब्द निश्‍चितच खरा करतील, असेही पाटील यांनी सांगितले होते. आज विमानतळावर आमदार कल्याणशेट्टी यांनी पाटील यांचे स्वागत केले. त्या वेळी पाटील यांनी स्वामींच्या मंदिरामध्ये दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. समर्थांनी माझा शब्द खरा केला, असेही पाटील यांनी आमदार कल्याणशेट्टी यांना सांगितले.

सोलापूर - कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची पूजा करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज सायंकाळी विमानतळावर आले.

त्यांच्यासोबत सहकारमंत्री सुभाष देशमुख होते. पाटील यांनी विमानातून खाली आल्यानंतर या ठिकाणी पत्रकार नाहीत का, असा प्रश्‍न कार्यकर्त्याला केला. त्या वेळी त्या कार्यकर्त्याने परस्परच पत्रकार आले नसल्याचे सांगून टाकले. त्यामुळे इच्छा असूनही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे माध्यमाला  बोलू शकले नाहीत. 
राज्यात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. अशाही स्थितीत महसूलमंत्री पाटील हे विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला गेले आहेत. मुंबईहून त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व सहकारमंत्री देशमुख हे विमानतळावर आले. पाटील यांचे विमानतळावर आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख आदींनी स्वागत केले. सत्तास्थापनेच्या संदर्भात आज राज्यपालांची भेट घेतली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी या वेळी कार्यकर्त्यांना बोलताना सांगितले.

सहकारमंत्र्यांच्या घरी चहापान
पाटील यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी थेट सहकारमंत्री देशमुख यांच्या घरी चहापानाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वाहनांचा ताफा थेट सहकारमंत्र्यांच्या होटगी रोडवरील घरी गेला. साडेपाच ते सव्वासहाच्या दरम्यान पाटील हे सहकारमंत्र्यांच्या घरी होते. देशमुख यांचा पाहुणचार घेतल्यानंतर पाटील हे पंढरपूरच्या विठ्ठलाकडे रवाना झाले. उद्या (शुक्रवारी) पहाटे त्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite the wish the revenue minister did not speak