बालभारतीकडून गणिताचा 'विनोद'; समजून घ्या दोन्ही बाजू!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

बालभारतीने गाणिताबाबत घेतलेल्या निर्णयावर दोन्ही बाजूने वाद सुरू आहेत. नेमका काय आहे हा वाद? समजून घ्या दोन्ही बाजू!

बालभारतीने गणिताच्या दुसरीच्या पुस्तकात 'दाक्षिणात्य' पद्धतीचा अवलंब करत, आकड्यांची ओळख सहज व्हावी म्हणून काही बदल केले. त्यामुळे आता सत्त्याहत्तर ऐवजी ''सत्तर सात', अठ्ठावीसऐवजी 'वीस आठ', पंचावन्न ऐवजी 'पन्नास पाच' अशी आकड्यांची ओळख या पुस्तकात करून दिली आहे. यावरून अनेक वादंग निर्माण झाले. लेखक-साहित्यिकांनी ही पद्धत अयोग्य आहे, तसेच मराठी व गणिताची ही मोडतोड आहे असे आरोप केले. या वादंगात दुसरीच्या विद्यार्थ्याने नेमके काय शिकावे हा प्रश्न कायमच आहे... 

नेमका काय आहे हा वाद? समजून घ्या दोन्ही बाजू!

'त्र्याहत्तर'ऐवजी आता 'सत्तर तीन' अशी असेल संख्यांची नवी ओळख
गणिताच्या पु्स्तकातील बदल हा 'दाक्षिणात्य' पद्धतीचा अवलंब करून ठरविण्यात आला आहे. तमीळ, कानडी, तेलुगू, मल्याळी या दक्षिण भारतीय भाषांमधील संख्यावाचनाच्या अभ्यासनंतर असे लक्षात आले की, तेथील विद्यार्थ्यांना ही पद्धत सोपी जाते. त्यामुळे ही पद्धत आम्ही बालभारतीमध्ये आणली. अठ्ठयाण्णव, त्रेसष्ठ, सत्तेचाळीस असे जोडाक्षर आले की मुले घाबरतात. ही भीती निघून जावी यासाठी नव्वद आठ, साठ तीन, चाळीस सात अशी संख्याओळख दुसरीच्या मुलांना करून देण्याचा निर्णय घेतला आहे', असे मत गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्षा गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांनी मांडले.

maths

संख्या नावातील बदल म्हणजे भाषेवरच अतिक्रमण'
'बालभारतीने दुसरीच्या संख्यानामात बदल करताना सर्व दृष्टीने विचार केला नाही. मुळात असा बदल करताना समाजात व्यापक विचारविनिमय व्हायला हवा होता. असे निर्णय भाषातज्ज्ञांशी सल्लामसलत केल्याशिवाय घेतला जाऊ नये. भाषा ही शिक्षणाशी, साहित्याशी, दैनंदिन व्यवहारांशी, संस्कृतीशी जोडलेली असते. भाषा हा संस्कृतीचा कणा असतो. त्यामुळे पाठ्यपुस्तकात केलेला एखादा बदल हा तेवढ्यापुरता राहत नाही. त्याचे अन्य क्षेत्रांवरही परिणाम होतात. काठिण्य पातळी कमी करणे, सोपी करणे ही शिक्षणातील उद्दिष्टे कशी काय असू शकतात? मग आपण विद्यार्थ्यांना कधीतरी काठिण्याकडे नेणार की नाही?' असा सवाल प्रा. रमेश पानसे यांनी केला.

maths

तुमचं मत काय आहे ?
'त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन' ही दुसरीच्या गणिताबाबतची बातमी सर्वप्रथम 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर गणिततज्ज्ञ आणि साहित्यिक यांच्यात वैचारिक वाद सुरू झाला आहे. या नव्या पद्धतीमुळे गणिताची गोडी लागेल, असं गणिततज्ञ सांगत आहेत. तर लेखकांना 'ही मराठीची मोडतोड' वाटत आहे. त्यामुळे काही लेखकांनी 'बालभारती'ला 'बाल भारती' म्हणायला सुरवात केली आहे. तुम्हाला काय वाटतं? कळवा webeditor@esakal.com वर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: detail analysis of controversy related to Balbharati Mathematics decision